रस्ते अपघात ठिकाणाची तपासणी करुन अहवाल सादर करावा
लातूर,दि.15(जिमाका): गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी अपघाताचे व त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अपघात कोणत्या ठिाकणी झाला व कशामुळे झाला याची तपासणी करुन अहवाल पुढच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आायोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळेस ते बोलत होते. याबैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी,अमर पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,व्ही. सी. भोये,कार्यकारी अभियंता, बी. एम. थोरात, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, गौरीशंकर स्वामी, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.लक्ष्मण देशमुख औसा-लातूर, चाकुर-लोहा, लातूर-कळंब या रोडवरील कंत्राटदार उपस्थित होते.
यावेळी रस्ता सुरक्षा अंतर्गत अपघात टाळण्यासाठी तयार केलेला Whatsapp क्रमांकास (9699403776) प्रसिध्दी देणे, बसेस वर स्टीकर्स लावण्याबाबत निर्देश देण्यात आले. या Whatsapp क्रमांकाचा वापर करुन सुजान नागरिक एखादे वाहन धोकादायक रित्या वाहतूक नियमाचे उल्लंघन करुन चालताना आढळल्यास, एखादया ठिकाणी अपघात झाला अथवा अपघात होण्याची शक्यता असल्यास तसेच रस्त्यावरील रस्ते विषयक रचना अपघातास कारणीभुत ठरत असल्यास त्याची सविस्तर माहिती वरील भ्रमणध्वनी क्रमांक / Whatsapp क्रमांकावर छायाचित्रासह पाठवल्यास अपघाताचे प्रमाण कमी करणे कामी संबंधीत शासकीय यंत्रणेस अवगत करता येईल व अपघाग्रस्त व्यक्तीला मदत मिळू शकेल. Mount Litera Zee School तसेच नवोदय शाळे समोर गतीरोध बसविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
लोकनेते विलासराव देशमुख मार्गावरील सर्वकष विकास आराखडयास अडथळा निर्माण होणारा देशीकेद्र शाळे जवळील सबवे पाडण्यास मंजुरी देण्यात आली. लातुर जिल्हयातील साखर कारखान्यांना त्यांच्याकडे वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफलेक्टर बसविण्याबाबत निर्देश देण्यात आले. लातूर जिल्हयातील अपघाताचे संख्या पाहून पोलीस विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लातूर जिल्हयात जास्त अपघात झालेल्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट व्याख्या अंतर्गत येणाऱ्या ठिकाणाचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राजीव गांधी चौक ते छत्रपती चौक वाडा हॉटेल जवळ स्ट्रीट लाईट व हाय मास्ट लवकरात लवकर बसविण्याच्या सुचना संबंधीत कंत्राटदारास देण्यात आल्या.
0 Comments