आज वाई येथे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या शुभहस्ते वाई शहरातील कृष्णा पूल, भाजीपाला-फळ मार्केट व शॉपिंग सेंटर आणि नगरपरिषद शाळा क्र.१ व ४ या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
वाई किरण जमदाड़े यांच्या कडून
कृष्णा नदीवरील सुमारे 100 वर्ष जुन्या ब्रिटीश कालीन पुलाच्या जागेवर नवीन पूलाचे बांधकाम करणे गरजेचे होते. या पुलामुळे नागरिकांना दळणवळण करण्यास सुलभता प्राप्त होणार आहे. वाई शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला व फळमार्केट तसेच नवीन शाळांचे, पुलाचे काम लवकरच पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे.
वाई शहरासाठी सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन यावेळी अजित दादांनी केले. वाई शहराचा विस्तार लक्षात घेता आवश्यक सुविधांची निर्मिती करण्यासाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येईल. वाई, महाबळेश्वर, खंडाळा, लोणंद, पाचगणीतील विविध सुविधांसाठी १० कोटी रुपये देण्यात येतील. वाई शहरातील भूमिगत गटार योजनेबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल. कृष्णा घाट विकास आणि नदी सुधार योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत सुरुर-पोलादपूर राज्य महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून समावेश करण्याबाबत विनंती करण्यात येईल. शहरांचा विकास करताना ती स्वछ आणि नीटनेटकी असायला हवीत. शहरातील सांडपाणी व्यवस्थापन चांगल्यारितीनं होणं गरजेचं आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आग्रही भूमिका घ्यावी. नव्यानं उभारण्यात येणाऱ्या शाळेच्या इमारतीमधून दर्जेदार शिक्षण देण्यात यावं. पुलाचे काम देखणे आणि दर्जेदार व्हावे. भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन डिसेंबरपर्यंत चार पदरी पुलाचा प्रस्ताव सादर करावा. येत्या अंदाजपत्रकात त्यासाठी मान्यता देण्यात येईल, असं कार्यक्रमाप्रसंगी बोलताना अजित दादांनी स्पष्ट केलं.
याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील खा. श्रीनिवास पाटील आ. शशिकांत शिंदे , आ. दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. उदय कबुले, उपाध्यक्ष श्री. प्रदीप विधाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुनील माने, मा. नितिन पाटील , वाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व पदाधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
0 Comments