डॉ. अफसर शेख यांच्यामध्ये धमक आहे राष्ट्रवादीला सत्ता द्या विकासाची जबाबदारी माझी : अजित पवार

 डॉ. अफसर शेख यांच्यामध्ये धमक आहे


राष्ट्रवादीला सत्ता द्या विकासाची जबाबदारी माझी : अजित पवार





औसा/प्रतिनिधी


औसा नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी मागील अनेक वर्षापासून औसा शहराच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना दिली. ऐतिहासिक मराठा भवन, स्पर्धा परीक्षा केंद्र, शहराची हद्दवाड, पाणी पुरवठा, आठवडी बाजार, शॉपिंग कॉम्प्लेक्स, शहरातील अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक कामाच्या माध्यमातून आपल्या कामाची धमक दाखवलेली आहे.



येणाऱ्या काळात औसा नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात द्या शहराच्या पुढील पाच वर्षाच्या विकासाची जबाबदारी मी घेतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. शनिवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी किल्ला मैदान औसा येथे आयोजित विराट


सभेस संबोधित केले. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, औसा हे ऐतिहासिक शहर असून सांस्कृतिक वारसा लाभल्यामुळे येथील महाशिवरात्रीचा उत्सव आणि ऊरुस सारखे उत्सव सर्वधर्मीय बांधव सहभागी होऊन आनंदाने साजरा करीत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कर्ता असून सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा आहे. डॉ. अफसर शेख हे सर्वसामान्य



जनतेच्या नेहमी सुख दुःखामध्ये सहभागी होत असल्यामुळे त्यांच्या वाट्याला जनतेचे प्रेम आले आहे.



स्वर्गीय एन. बी. शेख यांचे संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे आपल्या मिळालेल्या पदाचा सदुपयोग त्यांच्या हातून नेहमीच होत आलेला आहे. नगरपरिषदेची निवडणूक ही कार्यकत्यांची निवडणूक असून या अशा निवडणुकांच्या माध्यमातून कार्यकर्ता बळकट होत असतो


म्हणून येणाऱ्या काळात औसा शहराच्या विकासाला कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही.



मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून माझ्या वतीने, राज्य सरकार, केंद्र सरकार सह सी एस आर फंडामध्ये आमचा संपर्क असल्यामुळे जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विराट जनसमुदायाला दिले


राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परवीन नवबोद्दीन शेख यांच्यासह २३ सदस्यांना भरघोस मताने विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रारंभी डॉ. अफसर शेख यांनी प्रास्ताविकातून आपण केलेल्या कामाची माहिती विशद केली. माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचीही समायोजित भाषणे झाली. या विराट सभेच्या व्यासपीठावर शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, मकरंद सावे, अँड श्रीकांत सूर्यवंशी. दत्तात्रय कोळपे, बबन भोसले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परविन शेख, जावेद शेख, अविनाश टिके, मेहराज शेख, कृष्णा सावळकर, बाबा मुंगळे, गोविंद जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments