*औसा येथील जर्मन वायर चोरीचा गुन्हा उघड; तीन आरोपी जेरबंद, ३ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*
लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान औसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जर्मन वायर चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत छडा लावत तीन आरोपींना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेले जर्मन वायर तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले मालवाहू वाहन असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २३ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करत पीव्हीआर चौक ते औसा बायपास रोडवर सापळा रचण्यात आला.तेथे उभ्या असलेल्या MH-24-AU-2237 क्रमांकाच्या टाटा एस मालवाहू वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये चोरीचे जर्मन वायरचे चार बंडल (सुमारे १५० किलो) आढळून आले. वाहनातील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी औसा तालुक्यातील करजगाव पाटी परिसरातील पवनचक्की प्रकल्पातून जर्मन वायर चोरी करून स्क्रॅप म्हणून विक्रीसाठी लातूर येथे आणल्याची कबुली दिली.
त्यानंतर औसा पोलीस ठाण्यात पडताळणी केली असता या प्रकरणी गु.र.नं. ४१४/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले.
अटक करण्यात आलेले आरोपी
१) युनुस दस्तगीर शेख (वय ३८), रा. यहिया कॉलनी, लातूर
२)चमरुलाल नन्हुसिंग वरकडे (वय ३८), रा. कुटरायी, ता. शहापूर, जि. डिंडोरी (मध्य प्रदेश)
३) हरिचंद्र फगणू मरावी (वय ३०), रा. भानपूर, ता. सहपरा, जि. डिंडोरी (मध्य प्रदेश)
असे असून त्यांच्याकडून
चोरीचे जर्मन वायर (१५० किलो) किंमत ५५,०००,टाटा ACE XL BS-IV मालवाहू वाहन (MH-24-AU-2237) किंमत २,५०,००० असा एकूण ३,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपींना ताब्यात घेऊन जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी औसा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, पोलीस नाईक सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे व काकासाहेब बोचरे, रामदास बाचीफळे यांनी केली आहे.

0 Comments