भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा
*लतादीदींच्या जाण्याने झालेला शोक शब्दात व्यक्त केला आहे* अल्ताफ शेख प्रतिनिधी उस्मानाबाद.ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींच्या जाण्याने झालेला शोक शब्दात व्यक्त केला आहे.
"लतादीदींचं जाणं हे माझ्याप्रमाणे त्यांच्या जगभरातील कोट्यवधी चाहत्यांसाठी अतिशय दु:खद आहे. त्यांच्या गाण्यातील वैविध्य, दैवी सूर यांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला. त्यांनी आवाजातून भारताचं सौंदर्य मांडलं. भारतरत्न लतादीदींची कारकीर्द कालातीत आहे. शतकातून एकदा असा कलाकार जन्म घेतो. माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व भारावून टाकणारं होतं. दैवी आवाज आपल्याला सोडून गेला आहे पण त्यांची गाणी चाहत्यांच्या मनात रुंजी घालत राहतील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत", असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.
"लतादीदींचं जाणं शब्दातीत आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या पाईक म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना स्मरणात ठेवतील. चाहत्यांच्या मनावर गारुड घालणारा त्यांचा मंत्रमुग्ध आवाज स्तिमित करतो. लतादीदींची गाणी आपल्या मनात विविध भावनांची रुंजी घालतात. भारतीय चित्रपटांचं स्थित्यंतर त्यांनी अनुभवलं. चित्रपटांच्या पल्याड, भारताच्या विकासासाठी त्या सदोदित आग्रही असत. विकसित आणि सक्षम भारत त्यांना पाहायचा होता. लतादीदींचा वैयक्तिक स्नेह मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्याशी झालेलं बोलणं मी कधीच विसरू शकणार नाही. लतादीदींच्या जाण्याने देशवासीयांना झालेल्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी बोललो आणि शोकभावना व्यक्त केल्या", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"देशाची शान आणि संगीत जगताच्या शिरोमणी स्वरकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन अतिशय दु:खद आहे. पुण्यात्माला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचं जाणं देशाची अपरिमित हानी आहे. संगीत साधकांसाठी त्या सदैव प्रेरणास्थान राहतील" असं
*अलौकिक सूर हरपले*
--अमित विलासराव देशमुख
मुंबई, दि. ६ फेब्रुवारी
"आपल्या अलौकिक सूरांनी संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न लता मगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्र मूक झाले आहे", अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे.
"लता दीदींनी आपल्या अतुलनीय सूरांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या अनेक पिढ्यांना पडद्यावर आवाज देऊन त्यांचे व्यक्तिमत्व खुलविले. प्रत्येक भारतीयाच्या मनातील विविध भावभावना त्यांनी आपल्या गायनातून चपखलपणे व्यक्त केल्या. प्रदीर्घ काळ पार्श्वगायन क्षेत्रावर त्यांची मोहिनी होती आणि पुढेही राहील. देशाप्रती अत्यंत अभिमान असलेल्या लतादीदी संपूर्ण विश्वात भारताचा अभिमान म्हणून आदरास प्राप्त झाल्या. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.
लतादीदींशी देशमुख कुटुंबीयांचे निकटचे संबंध होते त्यांच्या जाण्याने मंगेशकर कुटुंबीयांना झालेल्या दुःखात देशमुख कुटुंबीय सहभागी आहेत ", असेही अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
0 Comments