दान आणि रमजान* …..................... बशीर शेख "कलमवाला" --------------------------

 *दान आणि रमजान*

….....................

बशीर शेख "कलमवाला"

--------------------------

*ज़कात, सदका, फित्र काय आहे*






ईश्‍वराची मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी ही आहे की त्याने आम्हा सर्वांना सर्वश्रेष्ठ जीव बनविले. सर्वश्रेष्ठ जीव का आहोत तर आम्हाला बुद्धीमान बनविले. सोबतच ब्रह्मांडातील सर्व साधन सामुग्री, वनस्पती, पक्षी, प्राणी आणि सर्वकाही मानवाच्या फायद्यासाठी बनविले. त्यामुळे निश्‍चितच ईश्‍वराने मानवांकरिता जेवढ्या उपलब्धी निर्माण केल्या आहेत त्या मानाने मानवाने ईश्‍वराचे कितीही उपकार मानले तेवढे कमीच आहेत. 


मानवाच्या जीवनाला अधिक पवित्र करणार्‍या गोष्टी कोणत्या आहेत तर ईश्‍वरावर दृढ विश्‍वास ठेवणे, ईशभक्ती, ईशनामस्मरण, ईशमार्गावर चालणे आणि ईश्‍वराने आपल्याला दिलेला चांगुलपणाचा आणि साधन संपत्तीला वैध मार्गाने खर्च करणे.


 सदरील सर्व गोष्टींची जाणीव आम्हाला रमजानचा महिना करून देतो. त्यामुळे आयुष्यातील माझ्या मते सर्वात मोठा आनंदाचा आणि आपल्या आत्म्याला तृप्त करणारा काळ कुठला असेल तर तो रमजानचा काळ. ऐहिक आणि पारलौकिक दृष्टिकोनातून.


या महिन्यात सर्वाधिक महत्त्व जेवढे उपासनेला आहे तेेवढेच दान देण्याला आहे. त्यामुळे हा महिना दानत्व प्रदान करणारा आहे, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. रमजानमध्ये प्रामुख्याने नमाज, रोजा, जकात, सदका, फित्र, कुरआन पठणाला अधिक महत्व आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी ज्या दानत्व प्रदान करणार्‍या आहेत त्यात जकात, सदका आणि फित्र आहे. 


मित्रानों ! एवढं महत्त्व का असेल या तीन गोष्टींना. तर विचार करा जेव्हा तुम्ही कुठल्या अडचणीत असता आणि त्यावेळी एखादी व्यक्ती त्याच्याजवळील तुम्हाला अडचणीतून बाहेर काढणारे साधन तुम्हाला कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता देते तेव्हा तुम्हाला सर्वात अधिक आनंद होतो. तसाच तुमच्या चेहर्‍यावरील तो आनंद पाहून समोरच्या व्यक्तीला जे समाधान मिळते ते बाजारात कुठेही खरेदी करून मिळत नाही.


 जीवनात जेव्हा निस्वार्थ भाव जपला जातो तेव्हा माणसाच्या अंगात असा रोमांचकारी भाव असतो की तो त्याला सदैव प्रफुल्लित ठेवतो. हा भाव सातत्याने आपल्या मनात तेवत रहावा,यासाठी रमजानचा महिना आपल्याला जकात, सदका आणि फित्रा देण्यासाठी प्रोत्साहित करतो. 



मित्रानों ! ईश्‍वर तुमच्या मनात निस्वार्थ भाव असला तरी तुम्हाला त्याचा मोबदला देतो. कधी डायरेक्ट मिळतो तर कधी इन्डायरेक्ट. परंतु, तो पावलोपावली जाणवतो. जर का मनुष्य विचार करणारा, चिंतन, मनन आणि मंथन करणारा असेल तर. एवढे जमत नसेल तर त्याच्या आंतरआत्म्यातील आवाज त्याला सांगत असतो.



तुम्ही पाहिले असेल जी व्यक्ती दान करण्यात आघाडीवर असते त्याचा चेहरा सदैव प्रफुल्लित असतो आणि जो व्यक्ती पैसा असून देखील कंजुषी करत असतो तो सदैव चिंतीत दिसतो. तो समाधानी दिसत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही घरावर तुळशीपत्र बांधून सर्व दानच करून टाकावं का? मित्रानों! असे नाही. ईश्‍वर कधीच आपल्या भक्तांना अडचणीत आणू इच्छित नाही. तो म्हणतो आम्ही तुम्हाला जेवढे दिले आहे, त्यामधील तुमच्या गरजेपेक्षा जे अतिरिक्त आहे ते द्यावे. जो सधन आहे, ज्याच्याकडे गरजेपेक्षा थोडे बहुत अधिक आहे, ज्याच्याकडे कमित कमी त्याच्या दैनंदिन लागणार्‍या धान्यापेक्षा पाच ते दहा टक्के अतिरिक्त आहे. त्यांनीच दान करावे. 


मित्रानों ! ईश्‍वरीय मार्गात तीच कमाई दान करावी जी ईमानेइतबारे कमाविलेली असेल. हेच अधिक पुण्याईचे कार्य आहे. 


मित्रानों! पहाना जकात त्याच व्यक्तीवर अनिवार्य करण्यात आलेली आहे ज्याच्याकडे कमीत कमी सात तोळे सोने अथवा 54 तोळे चांदी किंवा तेवढी रक्कम आहे. वर्षभरात सदरील रक्कम खर्च करून शिल्लक राहत असेल तर त्याने राहिलेल्या रक्कमेवर कमीत कमी अडीच टक्के रक्कम दान करावयाची आहे. आणि ती कोठे करावयाची आहे याचे आठ विभागही सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणे -


*जकात*

1. फकीर - फकीर म्हणजे भीक मागणारे किंवा असे लोक ज्यांची घरेलू अर्थव्यवस्था दुसर्‍याच्या मदतीशिवाय, चालू शकत नाही. समाजात अनेक लोक असे असतात उदा. विकलांग, वृद्ध, बेवारस, आजारी, निराधार महिला, काही अंशी बेरोजगार लोक किंवा एखाद्या मोठ्या अपघाताने गरीब झालेले लोक, अशा लोकांची मदत जकातद्वारे करता येते. किंवा किंबहुना करावयास हवी.  


*2. मिस्कीन* - मिस्कीन या शब्दाचा अर्थ आर्थिकदृष्ट्या असहाय्य लोक. समाजात असे अनेक लोक असतात जे वर-वर पाहता आर्थिकदृष्ट्या चांगले वाटतात. मात्र आतून त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असते. मात्र लोक लाजेखातर ते कोणासमोर हात पसरत नाहीत. त्यांच्यामध्ये आत्मसन्मानाची भावना इतकी जास्त असते की, प्रसंगी ते उपाशी राहतील पण कोणासमोर हात पसरविणार नाहीत. अशा लोकांना इस्लाममध्ये मिस्कीन म्हटले जाते. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी मिस्कीन व्यक्तीची व्याख्या खालीलप्रमाणे केलेली आहे. ‘मिस्कीन वो है जिसके पास उसकी जरूरत के हिसाब से माल नहीं होता, और ना वो पहेचाना जाता है के इसकी मदद की जाए. और न खडा होकर लोगों से मांगता है. गोया वो ऐसा शरीफ आदमी है जो गरीब है.’ 


*3. आमेलीन* म्हणजे असे लोक जे जकात वसूल करून शासन दरबारी जमा करण्याचे काम करतात. त्याचा हिशोब ठेवतात, नियमाप्रमाणे जकातीचे वाटप करतात. असे लोक मग ते फकीर किंवा मिस्कीन जरी नसले तरी त्यांचे वेतन वसूल झालेल्या जकातीमधूनच दिले जाईल. 

*4. तालीफुल खुलूब* म्हणजे असे लोक ज्यांचा ओढा इस्लामकडे आहे. मात्र ते मुस्लिम नाहीत. अशा लोकांची मदत करण्यासाठी किंवा जे लोक नव्याने इस्लाममध्ये दाखल झालेले आहेत, मात्र त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या समोर काही सामाजिक किंवा आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. अशा लोकांची मदत जकातीमधून करणे जरूरी आहे. 


*5. गुलाम/कैदी -*  युद्ध कैद्यांना गुलाम बनवून आणल्या गेल्यानंतर त्यांची गुलामीतून सुटका करण्यासाठी जकातीच्या रकमेचा उपयोग केला जाऊ शकतो. या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण विचार असा मनामध्ये येतो की, आजच्या काळात गुलामगिरी तर नाही मात्र ज्या मुस्लिम तरूणांना खोट्या आरोपाखाली वर्षानुवर्षे तुरूंगामध्ये सडविले जात आहे, ते एका प्रकारच्या आधुनिक गुलामगिरीतच आहेत. त्यांना सोडविण्यासाठी, चांगले वकील लावण्यासाठी व त्यासंबंधी इतर कामकाजासाठी जकातीची रक्कम खर्च केली जाऊ शकते का नाही यासंबंधी मुस्लिम उलेमांनी निर्णय घ्यावा. कारण की, हा आजच्या काळातील भारतीय मुस्लिम समाजाचा ज्वलंत प्रश्‍न आहे. साधारणपणे तरूण कमावती माणसेच तुरूंगामध्ये अडकल्यावर त्यांना सोडविणारे कोणीच राहत नाही. अशा वेळेस जकातीचा उपयोग करून त्यांना सोडविणे योग्य राहील, असे माझे मत आहे. 


*6. गारेनीम* म्हणजे असे लोक जे आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होते. मात्र त्यांच्यावर अचानक काही संकट आल्यामुळे/मोठा अपघात झाल्यामुळे ते कर्जबाजारी झाले असतील अशांची मदतही जकातीच्या पैशामधून करता येते. 

*7. फी सबिलिल्लाह*ः- म्हणजे यात ती सर्व कामे येतात ज्यामुळे सर्वश्रेष्ठ अल्लाह प्रसन्न होतो. म्हणजे प्रत्येक नेक (पुण्य) कामासाठी जकातीच्या पैशाचा उपयोग केला जाऊ शकतो. असा कित्येक उलेमांचा दावा आहे. मात्र बहुतेक उलेमांचे असे ठाम मत आहे कि, इस्लामी व्यवस्थेला सार्वजनिक जीवनामध्ये प्रस्थापित करण्यासाठी जे लोक कार्यमग्न असतात अशाच लोकांवर जकातीचा पैसा खर्च करता येऊ शकतो. मग असे लोक श्रीमंतही असू शकतात. स्वतःच्या व स्वतःच्या कुटुंबीयांच्या पालनपोषणासाठी त्यांना कुठल्याही मदतीची गरज नसू शकते. मात्र इस्लामी व्यवस्थेला लागू करण्यासाठी ते जे प्रयत्न करतात त्यासाठी त्यांच्यावर जकातीमधून खर्च करता येऊ शकतो. 

*8. प्रवासी* ः म्हणजे असे लोक जे स्वतः श्रीमंत असू शकतात. मात्र प्रवासा दरम्यान, काही कारणांमुळे ते गरजवंत होऊन जातात. (उदा. मोठा अपघात, माल चोरी होणे, लुटले जाणे इत्यादी.) अशा लोकांचीही मदत जकातीने करता येईल.  


मित्रानों वरील आठ विभागात जकातचा पैसा खर्च केला जातो. त्यामुळे ज्या अधिकृत संस्था, संघटना आहेत ज्या वरील 8 विभागात जकातचा पैसा खर्च करतात, त्याचा हिशेब ठेवतात अशांकडे आपण आपली जकात जमा करू शकता.


मित्रानों यानंतर *सदका* येतो. 

  अल्लाहला राजी करण्यासाठी अथवा अल्लाहच्या जवळ जाण्यासाठी केले जाणारे आर्थिक दान म्हणजे सदका. तसेच नेक आणि चांगले काम करणे हे ही सदका आहे. खरे तर सदका अशी गोष्ट आहे, ज्यामुळे माणसाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ईश्‍वरीय मदत मिळते, त्याच्यावर ओढवत असलेली बला टळते. सगळ्यात चांगला सदका अन्नधान्य, रकमेचा सदका आहे.

सदका देण्याची खरी प्रक्रिया अशी आहे की, आम्ही ज्याला रक्कम, माल देत आहोत त्याला न सांगता गुपचुप त्याच्या हातात किंवा खिशात पैसे द्यावेत. त्याला पैसे देताना असे समजू नये की मी त्याच्यावर उपकार करत आहे, परंतु, असे समजावे की तो माझे पैसे घेऊन माझ्या ऐहिक आणि पारलौकिक जीवनात पुण्याई जोडत आहे. प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, सदका आपल्यावर ओढवून येत असलेल्या 70 संकटांना दूर करतो. (जामए सगीर). कुरआनमध्येही याबद्दल मार्गदर्शन आलेले आहे. 

कुरआनमध्ये सांगितले आहे, ईश्‍वरीय मार्गात उत्तम माल खर्च करा. तुम्ही किंचितही नेकी प्राप्त करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तो माल ईश्‍वरीय मार्गात खर्च करत नाही जो तुम्हाला अधिक प्रिय असेल.

सदकामध्ये केलेला खर्च न संपणार्‍या पारलौकिक जीवनात जमा होत राहतो. भले श्रद्धावंत असा कसा विचार करू शकतो की तो आपल्या सदैव राहणार्‍या जीवनासाठी खराब आणि कामी न येणारा माल जमा करावा. 

कुरआनच्या सुरे बकरा आयत नं. 262 मध्ये म्हटले आहे की, *”जे लोक आपला माल अल्लाहच्या मार्गात खर्च करतात, त्यांच्या खर्चाचे उदाहरण असे आहे जसे एक बी पेरली जावी आणि तिच्यातून सात कणसे यावीत आणि प्रत्येक कणसांत शंभर दाणे असावेत. अशाच तर्हेने अल्लाह ज्याच्या कृतीला इच्छितो त्याला समृद्धी प्रदान करतो. तो उदारहस्त देखील आहे आणि जाणणारासुद्धा.”*

या आयातीवरून आम्हाला ईश्‍वरीय मार्गात पैसे खर्च करण्याचे महत्त्व कळते. 

-ः सदकतुल फित्र ः-

फित्र चा अर्थ रोजा सोडने अथवा ठेवण्याशी संबंधित आहे. ईश्‍वराने आपल्या अनुयायांवर एक दान अनिवार्य केलेले आहे. ज्याला रमजानच्या महिन्यात ईदच्या नमाजच्या अगोदर देणे बंधनकारक आहे. ज्याला स्वखुशीने अदा करावे लागते. सदकतूल फित्र घरातील प्रत्येक व्यक्तीवर, लहान बाळांच्या नावेही देणे अनिवार्य आहे. ते पावणे दोन किलो गहू अथवा त्याची रक्कम गरीब, फकीर, मिस्कीन सर्वांमध्ये वितरित करायची असते. रमजान महिन्यामध्ये फित्रा देण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे.  


मित्रानों! जकात, सदका आणि फित्राच्या माध्यमातून ईश्‍वर आपल्या अशा भक्तांचीही ईद ही गोड करतो जे गरीब आणि गरजू आहेत. ईदमध्ये शेजारी, पाजारी, मित्र परिवार आणि आप्तस्वकीय नातेवाईक, गरीब, फकीर सर्वांनाच सामील करून आनंद साजरा करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आनंदाचे दान आम्ही विसरू नये. दान आम्हाला समृद्धी देऊन जाते. मी कधी ऐकले नाही की कोणी दान करून कंगाल झाला आहे. दान करणार्‍या व्यक्तींबदल वाहवाईच ऐकली आहे. त्यांचे दर्जे बुलंद होताना पहावयास मिळाले आहे. मी ही माझ्या ऐपतीप्रमाणे सदैव दान करत असतो, आपणही याला प्राधान्य देऊन सुख, समृद्धी आणि समाधान प्राप्त करून ऐहिक आणि पारलौकिक जीवन यशस्वी करावे. 


*अल्लाह मला, तुम्हाला आणि सर्वांना याची सद्बुद्धी देओ आमीन.* (लेखक : 8830273038)


Post a Comment

0 Comments