मोहिते पाटील हाती घेणार तुतारी ! लवकरच प्रवेश
अकलूज/प्रतिनिधी : मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची आज शरद पवार यांच्यासोबत मुंबईत बैठक होणार आहे. त्यामुळे आज धैर्यशील मोहिते पाटलांना प्रवेश देवून त्यांची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता आहे. मोहिते पाटलांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळं आता धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी चिन्ह घेऊन माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहिते पाटील शरद पवार गटात गेल्यास पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जातेय. जयसिंह मोहिते पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार आहेत. बाकी सर्व मोहिते पाटील परिवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत जाणार असल्याचे जयसिंह मोहिते पाटील म्हणाले. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने मोहिते पाटील कुटुंबात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदावारी न दिल्यामुळं मोहिते पाटील कुटुंब नाराज आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं या मतदारसंघात मोहिते पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत. कोणत्याही स्थितीत लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत. तर काही कार्यकर्ते मोहिते पाटलांनी तुतारीच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी करत आहेत.
0 Comments