लातूर जिल्ह्यात 'चेक बाऊन्स' प्रकरणांसाठी
१८ जुलै व २१ नोव्हेंबरला विशेष लोक अदालतीचे आयोजन
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशान्वये लातूर जिल्हा व सत्र न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये १८ जुलै २०२६ आणि २१ नोव्हेंबर २०२६ रोजी परक्राम्य संलेख अधिनियम कलम १३८ नुसार दाखल असलेल्या 'चेक बाऊन्स' (धनादेश अनादरीत) प्रकरणांसाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या पक्षकारांची तसेच बँक व वित्तीय संस्थांची या कलमानुसारची प्रकरणे सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत, त्या सर्वांनी या विशेष लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्यंकटेश गिरवलकर आणि लातूर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवकुमार जाधव यांनी केले आहे.
या विशेष लोक अदालतीमध्ये पक्षकारांना आपली बाजू मांडण्यासाठी समान संधी मिळते आणि दोन्ही पक्षकारांना मान्य असलेली तडजोड आपसी संमतीनेच केली जाते. न्यायालयात वर्षानुवर्षे चालणाऱ्या प्रक्रियेला फाटा देत, येथे एकाच दिवशी आपसी संमतीने प्रकरण निकाली निघत असल्याने पक्षकारांचा मौल्यवान वेळ व पैसा वाचतो, तसेच प्रकरण निकाली निघाल्यावर भरलेले न्यायालयीन शुल्क देखील नियमानुसार परत मिळते. त्यामुळे सर्व संबंधित पक्षकार आणि विधीज्ञांनी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली प्रलंबित प्रकरणे मोठ्या प्रमाणावर आपसी तडजोडीने निकाली काढावीत, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

0 Comments