औसा येथे आयोजित हिजामा कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद
औसा (प्रतिनिधी) : औसा येथील ऑर्बिट प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय हिजामा कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अल-हयात हिजामा सेंटर, चारमिनार हैदराबाद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरामध्ये तब्बल 50 जणांनी हिजामा थेरपी करून लाभ घेतला.
हा कॅम्प शुक्रवार, शनिवार आणि रविवार रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. कॅम्पमध्ये प्रसिद्ध हिजामा तज्ज्ञ डॉ. सय्यद असलम यांनी आपली सेवा देत रुग्णांवर हिजामा उपचार केले. आधुनिक व स्वच्छ पद्धतीने करण्यात आलेल्या उपचारांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून आले.
या कॅम्पमध्ये पाठदुखी, मायग्रेन, थकवा, रक्तदाब, सर्व्हायकल, गॅस तसेच इतर शारीरिक समस्यांसाठी नागरिकांनी हिजामा करून घेतला. डॉ. सय्यद असलम यांनी हिजामाचे फायदे सांगताना हे एक नैसर्गिक आणि सुन्नत पद्धतीवरील उपचार असून शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास आणि अनेक आजारांमध्ये आराम मिळवून देण्यास उपयुक्त असल्याचे सांगितले.
कॅम्पदरम्यान नागरिकांनी हिजामा थेरपीच्या सकारात्मक परिणामांची आणि आरोग्यदायी फायद्यांची प्रशंसा केली. समाजामध्ये नैसर्गिक आणि सुन्नत पद्धतीच्या उपचारांविषयी जागरूकता वाढत असल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी या कॅम्पमध्ये सहभाग घेतल्याचे आयोजकांनी सांगितले.
कॅम्पच्या यशस्वी आयोजनाबद्दल ऑर्बिट प्री-प्रायमरी स्कूलच्या वतीने डायरेक्टर ॲड. इकबाल शेख, प्राचार्या अंजुमनेहा शेख, उमर शेख, मजहर पटेल आणि सय्यद शेख यांनी डॉ. सय्यद असलम यांचा सत्कार करून स्वागत केले तसेच त्यांच्या सामाजिक व आरोग्यविषयक सेवाकार्याचे कौतुक केले.
स्थानिक नागरिकांनी अशा आरोग्य शिबिरांमुळे समाजाला मोठा लाभ होत असल्याचे सांगत भविष्यातही अशा कॅम्पचे आयोजन करण्याची मागणी केली. कॅम्पच्या यशस्वीतेबद्दल आयोजकांच्या वतीने डॉ. सय्यद असलम यांचे आभार मानण्यात आले.


0 Comments