*नीटचा पेपरच नव्हे, व्यवस्थेचा चेहरा फुटला!*
- बशीर शेख "कलमवाला"
-----------------------------------
*22 लाख विद्यार्थ्यांना फटका ः शैक्षणिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचारावर अंकुश कसा लावणार?*
-----------------------------------
*‘नीट’2024 लाच अपडेट व्हायला हवी होती. त्यावेळेस जर एटीएस व सीबीआयने कसून तपास केला असता तर एनटीएमधील गौडबंगाल समोर आले असते. अन् 22 लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असते.*
-----------------------------
*भरगच्च पैसा, नोकरी असून देखील जेव्हा भ्रष्टाचारात हात काळे करत लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान करू वाटते तेव्हा अशा देशद्रोह्यांना कसलीच भीती कशी वाटत नसेल.*
--------------------------------
*देशातील* लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारी ‘नीट (नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट)’ परीक्षा आज केवळ शैक्षणिक स्पर्धा राहिलेली नाही; ती व्यवस्थेतील भ्रष्टाचार, कोचिंग माफिया आणि पैशांच्या साखळीचे भयावह चित्र बनली आहे. नीट-युजी 2026 पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण देश हादरला असताना एक प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे, 2024 मधील पेपर फुटी प्रकरणावेळी कठोर कारवाई झाली असती, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती? यामुळे एनटीएचा बोगसपणाही समोर आला आहे.
यंदा 22 लाख विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा पुन्हा द्यावी लागत आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन ढासळले, पालक आर्थिक आणि भावनिक तणावात गेले, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्यासारखे झाले आहे. *एनटीएमधील प्रा. पी. डी. कुलकर्णी, प्रा. मनिषा मांढरे हे दोन मास्टर माईड समोर आले आहेत.* शिवाय, देशातील अनेक कोचिंग क्लासेसचे संचालक, एजंट, आर्थिक व्यवहार, प्रश्नपत्रिकांचे पीडीएफ, डिजिटल पुरावे आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले गेस पेपर यामुळे हा घोटाळा एखाद्या संघटित गुन्हेगारी नेटवर्कसारखा स्पष्ट दिसत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, पेपरफुटीविरोधात आवाज उठवणारे प्रा.शिवराज मोटेगावकर सारखे काही चेहरे आज स्वतःच चौकशीच्या भोवर्यात अडकले आहेत. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आंदोलन करणारेच आरोपी ठरू लागल्याने शिक्षण क्षेत्रातील नैतिक दिवाळखोरी उघडी पडली आहे. समाजाला दिशा देणारे शिक्षक, डॉक्टर आणि शिक्षणसंस्था जर पैशाच्या मोहात अडकत असतील, तर ही केवळ कायदेशीर बाब राहत नाही; तो समाजाच्या आत्म्यावरील आघात ठरतो.
राजस्थानातील एका सतर्क शिक्षकामुळे या प्रकरणाचा भंडाफोड झाला. एका पीडीएफमधील तब्बल 45 प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे आढळल्यानंतर एनटीए आणि सीबीआयला युद्धस्तरावर तपास करावा लागला. *तपास महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, दिल्ली, नागपूर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूरपर्यंत पोहोचला. विद्यार्थ्यांचे मोबाईल, लॅपटॉप, आर्थिक व्यवहार, व्हॉट्सअॅप चॅट आणि एजंटांचे नेटवर्क तपासले जात आहे.* काही पालकही संशयाच्या रडारवर आहेत. यामुळे मेहनत आणि गुणवत्ता यांच्यापेक्षा सेटिंग आणि पैसा मोठा ठरत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
*खरे तर 2024 च्या जून महिन्यातच एटीएसला नीट पेपरफुटी बाबत गोपनिय माहिती प्राप्त झाली होती. त्यावेळेस लातूर च्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये एटीएसचे सहायक पोलीस निरीक्षक आवेज काझी यांनी पेपरफुटीबाबत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास तत्कालीन लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनी करुन पुढील तपास सीबीआयकडे सोपविलेला होता. यावेळी एटीएस अधिकार्यांनी वरिष्ठांकडे लातूरच्या क्लासेस चालकांचा क्लास घ्यावा, असे सुचित केले होते.*
यावेळी जर पोलिस आणि यंत्रणांनी गंभीरपणे तपास केला असता, तर आजचा हा महाघोटाळा नक्कीच टाळता आला असता आणि अनेक मासे गळाला लागले असते. दुर्लक्ष, राजकीय दबाव किंवा व्यवस्थेतील सैलपणा यामुळे भ्रष्ट साखळी अधिक मजबूत झाली का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
*सीबीआयने तपासाचा वेग वाढविला आहे. मात्र या तपासात केवळ खालच्या पातळीवरील एजंट आणि मध्यस्थ अडकतील की मोठे मासेही समोर येतील, याबाबत नागरिकांत शंका आहे. कारण भारतात अनेकदा घोटाळ्यांमध्ये मुख्य सूत्रधार पडद्यामागेच राहतात आणि काही चेहरे पुढे करून प्रकरण थंड केले जाते.*
पेपर फुटी प्रकरणाने कोचिंग संस्कृतीचे भयावह वास्तवही उघड केले आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न आता ज्ञानापेक्षा पैशांच्या बाजारात विकले जाऊ लागले आहे. गॅरंटी, इनसाइडर संपर्क, स्पेशल सेट, रँक निश्चित अशा आमिषांनी पालक आणि विद्यार्थ्यांची मानसिकता व्यापारी जाळ्यात अडकवली आहे. शिक्षण ज्ञानदानाचे केंद्र राहिले नाही; ते आता बाजार झाले आहे. सरकारने पुनर्परीक्षेची घोषणा केली, बायोमेट्रिक पडताळणी, क्यूआर कोड, डिजिटल मॉनिटरिंग यासारखे उपाय केले जातील. पण प्रश्न फक्त सुरक्षेचा नाही; प्रश्न विश्वासाचा आहे. दोन-दोन वर्षे रात्रंदिवस अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांच्या मनातील असुरक्षितता कोण दूर करणार?
*मौलाना अबुल आला मौदुदी यांनी म्हटले होते, ज्या समाजात शिक्षणाचे उद्दिष्ट चारित्र्य निर्मितीऐवजी केवळ पद, पैसा आणि सत्ता मिळवणे बनते, त्या समाजात भ्रष्टाचार अपरिहार्य होतो.*
*आज ‘नीट’ घोटाळ्याकडे पाहताना हे शब्द भयावह वास्तवासारखे वाटतात. ‘नीट’ पेपरफुटी ही केवळ एका परीक्षेची चूक नाही; ती देशाच्या नैतिक व्यवस्थेतील दरी आहे. कारण जेव्हा शिक्षणातील प्रामाणिकपणा मरतो, तेव्हा समाजातील विश्वासही मरतो. आणि विश्वास हरवलेला समाज आतून कमकुवत झालेला असतो.*
शेवटी, महाराष्ट्रातील अनेकजण लातूर पॅटर्न संबंधी उलट सुलट चर्चा करत आहेत. लातूर पॅटर्न हा काही क्लासेसवाल्यांनी घडविलेला नाही. येथील शेकडो शाळा, शिक्षक, महाविद्यालय, प्राध्यापकांनी घडविला आहे. आजही ते सातत्याने लातूर पॅटर्नसाठी कायम धडपड करत असतात. तसेच सरकारने प्रा. कुलकर्णी, प्रा. मांढरे, प्रा. मोटेगावकर व अन्य आरोपींच्या घरावर एवढा मोठ्या संगठीत देशद्रोह्यासारख्या गुन्ह्याप्रकरणी अजून तरी सरकारने बुलडोजर चालवले नाही.

0 Comments