स्वातंत्र्य दिनानिमित्त मुरूम येथील महाविद्यालयात विविध उपक्रम
इम्रान सय्यद
मुरूम/ प्रतिनिधी
मुरूम : स्वातंत्र्य दिनानिमित्त मुरूम येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भारत शिक्षण संस्थेचे संचालक त्र्यंबक इंगोले यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांच्या सहभागातून मुरूम शहरातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. तसेच ‘राष्ट्रप्रेम’ या विषयावर रांगोळी स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महाविद्यालय परिसर स्वच्छता अभियान आदी उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण व्हावी, यासाठी ‘नशामुक्त भारत, भयमुक्त भारत आणि कॉपीमुक्त भारत’ या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
कार्यक्रमास भारत शिक्षण संस्थेचे संचालक रामराव इंगोले, माजी प्राचार्य डी. टी. इंगोले, महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद इंगोले, मुरूम शहरातील माजी प्राध्यापक, माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, महाविद्यालयातील माजी विद्यार्थी देवराव मरबे यांची सैन्य दलात निवड झाल्याबद्दल त्यांच्या देशसेवेच्या भावनेचा गौरव करत महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, स्वच्छता आणि व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

0 Comments