https://youtu.be/HtWIizl1v-s?si=DF39l_sWJ0bo_aId
पंडित सुंदरलाल समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करा
पीडित कुटुंबांना न्याय व आर्थिक मदत देण्याची एम आय एम ची राष्ट्रपतींकडे मागणी
औसा, प्रतिनिधी : हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर झालेल्या पोलीस कारवाईच्या काळात नुकसान झालेल्या पीडित कुटुंबांना न्याय मिळावा, तसेच पंडित सुंदरलाल समितीच्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी एम.आय.एम. औसाच्या वतीने राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
येथील एम.आय.एम. प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन तहसीलदार, औसा यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन १९४८ मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर झालेल्या पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंडित सुंदरलाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने हैदराबादसह मराठवाडा विभागाचा दौरा करून केंद्र सरकारला अहवाल सादर केला होता. या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, त्या काळातील हिंसाचारात अनेक कुटुंबांचे जीवित व मालमत्तेचे नुकसान झाले. महिलांवर अत्याचार झाल्याचा तसेच मालमत्ता आणि जमिनींचे नुकसान झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. पीडित कुटुंबांचा शोध घेऊन त्यांच्या वारसांना आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी आणि दोषींच्या नावावर असलेली मालमत्ता जप्त करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पोलीस कारवाईदरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृत्युप्रमाणपत्र संबंधित नगरपालिका व ग्रामपंचायतींकडून देण्याबाबत सूचना करण्यात याव्यात, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
“या मागण्या गेल्या १६ ते १७ वर्षांपासून करण्यात येत आहेत; मात्र अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. पीडित कुटुंबांना न्याय कधी मिळणार?” असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.

0 Comments