*विद्यार्थ्यांचा डीजे डॉल्बीला नकार; लेखणीतून ध्वनीप्रदूषणाविरुद्ध जनजागृती.*
डीजे-डॉल्बी मुक्त गणेशोत्सवासाठी २,४८० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; आरोग्य आणि पर्यावरणाच्या संरक्षणावर परखड विचार.
लातूर( प्रतिनिधी )गणेशोत्सवातील वाढते ध्वनीप्रदूषण आणि डीजे डॉल्बीच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्य व पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात तालुक्यातील तब्बल २,४८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून डीजेमुक्त गणेशोत्सवाच्या संकल्पनेला लेखणीतून पाठिंबा दिला.
पोलीस उपअधीक्षक तथा शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय जाधव यांच्या पुढाकारातून दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी तालुक्यातील विविध शाळांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.‘ध्वनीप्रदूषणाला (डीजे-डॉल्बीला) नकार, पारंपरिक वाद्यांचा स्वीकार : संस्कृती संवर्धनाची नवी दिशा’ या विषयावर आयोजित स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
गणेशोत्सवाच्या नावाखाली डीजे डॉल्बी साऊंड सिस्टिम आणि कर्णकर्कश ध्वनिवर्धकांचा वाढता वापर अनेकदा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून त्यातून ध्वनीप्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या संवेदनशील मनातून या विषयावर विचारमंथन घडवून आणण्याचा पोलिसांचा हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला.
*लेखणीतून उलगडले आरोग्य आणि पर्यावरणाचे महत्त्व.*
स्पर्धेतील निबंधांमधून विद्यार्थ्यांनी ध्वनीप्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अत्यंत प्रभावीपणे मांडला. कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास, श्रवणशक्तीवर होणारे परिणाम तसेच मानसिक स्वास्थ्यावर होणारे दुष्परिणाम यावर विद्यार्थ्यांनी परखड भाष्य केले.ध्वनीप्रदूषणामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांकडेही विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून लक्ष वेधले. उत्सव साजरा करताना आनंदाबरोबरच सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक असल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.पारंपरिक वाद्यांचा स्वीकार केल्यास आपल्या सांस्कृतिक परंपरांचे जतन होण्याबरोबरच उत्सवाला अधिक सुसंस्कृत आणि पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त होऊ शकते, असे विचारही विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधांतून मांडले.
*स्पर्धा केवळ बक्षिसांसाठी नव्हे, तर सामाजिक प्रबोधनासाठी.*
ही निबंध स्पर्धा केवळ बक्षिसांपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि पर्यावरणाबाबतची जाणीव निर्माण करणारी ठरली. स्पर्धेतील उत्कृष्ट निबंधांची तालुकास्तरावर निवड करण्यात येणार असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र, मानाची ट्रॉफी आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.
गणेशोत्सवात केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक प्रबोधनाची जबाबदारीही पोलिसांनी स्वीकारल्याचे या उपक्रमातून दिसून आले. पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेली ही निबंध स्पर्धा नव्या पिढीला पारंपरिक वाद्यांचे महत्त्व पटवून देणारी आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी मोहीम ठरली.विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश पालकांपर्यंत आणि त्यानंतर व्यापक समाजापर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. ‘ध्वनीप्रदूषण टाळूया, संस्कृती जपूया; डीजेला नकार देऊन पारंपरिक वाद्यांचा स्वीकार करूया’ हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचत असून, डीजेमुक्त आणि शांततापूर्ण गणेशोत्सवासाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील विद्यार्थ्यांनी दिलेला हा सकारात्मक प्रतिसाद निश्चितच दिशादर्शक ठरत आहे.

0 Comments