तुळजापुर तालुक्यात गारपीटसदृश अवकाळी पावसाची हजेरी!
तुळजापुर : आज दिनांक २८ एप्रिल (शुक्रवार) रोजी तालुक्यात गारपीटसदृश अवकाळी पावसाने दुपारी ३ ते ६ वाजण्याच्या दरम्यान हजेरी लावली. सोबत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वादळी वारा यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. शहरातील लातुर रोड बसस्थानकच्या बाजूला लावलेले होर्डींग्स वार्यामुळे कोसळले. तसेच वीजेचे लोखंडी पोलदेखील क्षतिग्रस्त झाले.
तुळजापुर तालुक्यात वादळी वार्याने भयंकर रूप धारण केले होते. तालुक्यातील अनेक गावातील घरांचे पत्रे उडुन गेले आहेत. याशिवाय विविध ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने काही काळासाठी वाहतुक ठप्प झाली होती. तालुक्यातील अणदुर- नळदुर्ग परिसरात विजेचे खांब पडल्याची घटना घडली. परिणामी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. याचबरोबर काटगाव-चव्हाणवाडी रस्त्यावर मोठे झाड पडल्याने तुळजापुरहुन रात्री ९ वाजता मुक्कामी येणारी महामंडळ बस चव्हाणवाडीतच थांबली परिणामी काटगावला येणार्या प्रवाशांचे रात्रीच्या सुमारास हाल झाले.
याशिवाय तालुक्यातील अनेक गावात देखील हीच परिस्थिती होती. वीजपुरवठा खंडित केल्याने मोबाईल टाॅवर्स बंद होते परिणामी नेटवर्क नसल्याने नागरिकांना एकमेकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत होत्या.
अवकाळी पावसाच्या अवकृपेने बळीराजा मात्र पुरता नामोहरम झाला आहे. कुणाच्या कडब्याच्या बनीमीवरील ताडपत्री उडुन गेली आहे तर कुणाच्या शेतातील शेडचे पत्रे या वादळी वार्यामुळे उडुन गेले आहेत. याचबरोबर अवकाळी पावसामुळे 'द्राक्ष उत्पादक शेतकरी' संकटात सापडला आहे. या पावसामुळे बागावर बुरशीची वाढ होऊन रोग पडण्याची शक्यता आहे. परिणामी बुरशीनाशकांच्या फवारणीमुळे द्राक्ष उत्पादकांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊन आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
शेतकरयांनी आपली जनावरे गोठ्यात, झाडापासुन दुर सुरक्षित ठिकाणी बांधावे, असे आवाहन तालुका कृषी अधिक्षक, तुळजापुर यांनी शेतकरयांना केले आहे.
शाहबाज तालिकोटे, तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र रिपोर्टर
Ranajagjitsinha Patil



0 Comments