ऑपरेशन शोध-III” मोहिमेत लातूर पोलिसांची प्रभावी कामगिरी : 150 महिला व बालकांचा शोध – सुरक्षित पुनर्वसनास प्राधान्य.*


*“ऑपरेशन शोध-III” मोहिमेत लातूर पोलिसांची प्रभावी कामगिरी : 150 महिला व बालकांचा शोध – सुरक्षित पुनर्वसनास प्राधान्य.*



लातूर : लातूर जिल्हा पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वतीने दिनांक 06 मार्च 2026 ते 22 मार्च 2026 या  कालावधीत पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांचे निर्देश व सूचनेवरून अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात  अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भालचंद्र तिडके आणि त्यांच्या टीमने  संपूर्ण जिल्ह्यात “ऑपरेशन शोध-III” ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.या मोहिमेचा मुख्य उद्देश अनैतिक मानवी वाहतूक रोखणे, बेपत्ता महिला व बालकांचा शोध घेणे, तसेच संशयित ठिकाणी छापे व तपासणी करून महिला व बालकांचे संरक्षण करणे हा होता.

              सदर मोहिमेदरम्यान लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत समन्वय साधून विविध ठिकाणी शोधमोहीम, तपासणी, छापे व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. रेल्वे स्थानके, बसस्थानके, हॉटेल्स, लॉज, ढाबे, सार्वजनिक ठिकाणे तसेच संशयित परिसर येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा मार्फत काटेकोर तपासणी केली. यामध्ये सामाजिक संस्था, महिला व बालकल्याण विभाग, तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्य देखील घेण्यात आले.

             या व्यापक मोहिमेत उल्लेखनीय यश मिळाले असून एकूण 150 महिला व बालकांचा शोध लावण्यात आले आहे. त्यामध्ये  121 महिला ,  23 मुली , आणि 06 मुले  असे एकूण 150 जणांचा शोध लावण्यात यश प्राप्त झाले आहे. शोधण्यात आलेल्या सर्व महिला व बालकांची सखोल पडताळणी करून त्यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्यांच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ज्या प्रकरणांमध्ये आवश्यक होते, त्या ठिकाणी संबंधितांना पुनर्वसन केंद्रात दाखल करून त्यांच्या सुरक्षिततेची व भविष्यातील संरक्षणाची योग्य काळजी घेण्यात आली आहे.

          “ऑपरेशन शोध-III” ही मोहीम केवळ शोधापुरती मर्यादित नसून समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आणि अनैतिक मानवी वाहतूक रोखण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरली आहे. या मोहिमेमुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या हरवलेल्या सदस्यांचा पुन्हा सहवास मिळाला आहे.लातूर जिल्हा पोलीस दला कडून अशा मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे.

              नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणतीही संशयास्पद हालचाल, मानवी तस्करी संदर्भातील माहिती अथवा बेपत्ता व्यक्तींबाबत माहिती असल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशा मोहिमा अधिक प्रभावीपणे यशस्वी होऊ शकतात.

Post a Comment

0 Comments