हे ईमानधारकानो, विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल. (कुरआन सूरह अलबक़रा 2: आयत नं. 183)
अनेक लोकांना असे वाटते की रमजानचे उपवास फक्त मुस्लिमच ठेवत आहेत. मात्र प्रेषित मुहम्मद (सल्ललाहु अलैही व सल्लम) यांच्या अगोदरही अनेक प्रेषित होऊन गेले त्यांच्यावर व त्यावेळच्या समुहांवर उपवास अनिवार्य करण्यात आले होते. जेणेकरून ते सर्वही तक्वा (ईश्वराने सांगितलेला चारित्र्य संपन्नतेचा मार्ग) धारण करतील. जेणेकरून त्यांचे ऐहिक आणि पारलौकिक जीवन सुसह्य व्हावे.
मित्रांनो! आजच्या मानवांमध्ये चारित्र्यसंपन्नतेची वाणवा दिसून येते. व्याभिचार, भ्रष्टाचार, बेईमानी, खोटे बोलणे, चाड्या-चुगल्या करणे, धर्मांधता, भांडणे लावणे, अश्लीलता पसरविणे अशा एक ना अनेक बाबी आहेत ज्या मनुष्याच्या पावित्रतेला भंग करणाऱ्या आहेत.
रमजानचे उपवास, कुरआनचे आणि प्रेषितांचे मार्गदर्शन मनुष्यामध्ये ईशपरायणता (तक्वा ) निर्माण करतात. दीनचर्येच्या सर्व अवैध बाबींपासून दूर ठेवतात, चारित्र्यसंपन्न व्यक्ती बनवतात. नमाज दिवसातून पाच वेळेस होते. प्रत्येक वेळी ईमानधारकांना सत्य मार्गावर चालण्याची ताकीद केली जाते. नमाज बेहयाई आणि वाईट बाबींपासून श्रद्धावंतांना दूर ठेवते.
कुरआनची भाषा अरेबी असल्याने लोक त्याला समजून घेण्यास कमी पडतात. जगात सर्वाधिक वाचला जाणारा आणि पाठांतर केला जाणारा ग्रंथ कुरआन आहे. मात्र समजून उमजून वाचणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे गोंधळ उडतो.
सध्या अनेक भाषेत कुरआनचे भाषांतर उपलब्ध झाले ते वाचले तर मोठ्याप्रमाणात आपले कन्सेप्ट क्लेअर होवून ईश्वरीय संदेश थेट आपल्या भाषेत आपण जाणून घेऊ शकतो. आणि आपल्यात सुधारणा घडवून आणू शकतो.
रमज़ानचा आज दूसरा उपवास होता. शरीराने आज काही संकेत दिले. ते हे की उन्हामध्ये गरजेहून अधिक फिरणे टाळा. आज उन्हाची तीव्रताही वाढलेली होती. अशा परिस्थितीतही माझ्या ७ वर्षाच्या मुलाने आज पहिला रोजा केला. पहाटे माझ्याबरोबर सहेरी केली. तो थोडाच जेवला. पाणीही जास्त पिले नाही. सहेरीची दुआ पठण करून रोजा धरला. माझ्यासोबत फज़रच्या नमाजलाही आला. शाळा ७ वाजता असल्याने त्याला झोपण्यास वेळ मिळाला नाही.
त्याच्या आईला वाटले हा काय रोजा पूर्ण करेल म्हणून त्याच्या बॅगमध्ये पाण्याची बाटली ठेऊन दिली. आईची माया. मुलगा शाळेत ६.४५ ला गेला आणि ११ वाजता घरी आला. आईने बॅगेत पाहिले तर पाणी तसेच होते. त्याला विचारले पाणी पिला नाहीस त्याने म्हटले मी रोजा आहे. तो पुढे म्हणाला शाळेत आज केळीही दिली मात्र मी खाल्ली नाही. सोबत घेऊन आलो. आईला मोईदच्या संयमाची खात्री पटली. तो दिवसभर घरी होता. माझ्यासोबत त्याने आज पाचही वेळेसची व अतिरिक्त तरावीहची नमाज पठण केली. ईफ्तारच्या वेळेस आजीने नवीन कपडे, पुष्पहार घालून सत्कार केला. आणि या चिमुकल्या मोईदचा आज आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण झाला.
ईश्वरीय मार्ग सत्याने आणि सन्मानाने जगण्यास प्रवृत्त करतो. मात्र मनुष्याला ते बंधन वाटते. तो स्वैर जगण्याला अधिक पसंती देतो आणि अडचणीत सापडतो.
कुरआन मध्ये म्हटले आहे "ते समस्त मानवकल्याणाकरिता आहे." त्यावर कोणाची मक्तेदारी नाही.
जे हे मार्गदर्शन वाचेल ते स्वतःला नक्कीच भाग्यवान समजेल.
मला आणि सर्वांनाच ईश्वर कुरआन समजून वाचण्याची व त्यावर अमल करण्याची सद्बुद्धी देओ आमीन.....
-- बशीर शेख 'कलमवाला ' १३.३.२०२४
0 Comments