नाझिया इलाही खान यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात औसा पोलीस ठाण्यात तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी.
औसा | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रवक्त्या असल्याचा दावा करणाऱ्या नाझिया इलाही खान यांच्या सोशल मीडिया व सार्वजनिक माध्यमांतील कथित आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात औसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी पोलीस निरीक्षकांकडे सादर केली.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, नाझिया इलाही खान यांनी मुस्लिम समाजाचे प्रेषित पैगंबर मोहम्मद (स.अ.) यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या असून समाजात तेढ, द्वेष आणि असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधित व्हिडिओ, सोशल मीडिया पोस्ट आणि इतर डिजिटल पुरावे इंटरनेटवर उपलब्ध असल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध लागू असलेल्या कायद्यांनुसार गुन्हा नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच हे प्रकरण द्वेषपूर्ण भाषणाच्या (Hate Speech) स्वरूपाचे असल्याचा आरोप करत संबंधित कायदेशीर तरतुदींचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस प्रशासनाकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी अपेक्षा तक्रारदारांनी व्यक्त केली आहे.




0 Comments