*रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले, मानवजातीकरिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. आणि जे आजारी असतील किंवा प्रवासात असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे.* (कुरआन सूरह (अध्याय) अलबक़रा 2 : आयत नं 185)
*आज रमजानचा पहिला रोजा होता. उन्हाची तीव्रता असूनही ती जानवली नाही. घरातील १२ वर्षाआतील २ मुली आणि एका मुलाने रोजाचा उपवास पूर्ण केला. उल्हासाने त्यांनी पहाटे माझ्याही अगोदर उठून सहेरी करण्यास सुरूवात केली. लहान मुलांनी फजरची नमाज माझ्यासोबत मस्जीदमध्ये जावून अदा केली. मुलींनी त्यांच्या आईसोबत घरीच नमाज अदा केली. त्यांचा उत्साह एवढा होता की, एरव्ही शाळेला उशीर करणारे आज वेळेत शाळेत पोहोचले. घरी आल्यानंतर जोहर, असरची नमाज अदा केली. शिवाय, उपवासादरम्यान कुठलीही तक्रार केली नाही की, मला तहान, भूग लागली. एरवी सायंकाळी पाच वाजेपर्यंत २ ते ३ वेळा जेवण, कुरकुरे, चिप्सवर त्यांचा ताव असतो . मात्र आज त्यांनी निर्जळी उपवास केला. सायंकाळी इफ्तारच्या वेळी त्यांनी आपल्या पॉकेटमनीतून चिप्स, कुरकुरे आणून ठेवले. त्यांनी आज रोजा, कुरआन याबद्दल जिज्ञासेने प्रश्न विचारले. मी त्यांना त्याचे समर्पक संदर्भासहीत उत्तरे दिली. लहान मुलांवर रोजे अनिवार्य नाहीत मात्र ते उल्हासाने महिन्यातून कमीत कमी चार-पाच उपवास करतात. हा महिना खडतर प्रशिक्षणाचा वाटत असला तरी ईश्वरावर अगाढ आस्था, कुरआनमधील सुस्पष्ट वचने, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची वचने खडतर प्रशिक्षणाला लिलया पूर्ण करण्याची ताकद देतात. कुरआनचा विषय मनुष्य आहे. ते समस्त मानवकल्याणासाठी मार्गदर्शन आहे. रमजान महिन्यात कुरआनचे अवतरण झाले. त्यामुळे आपण आयुष्यात एकदा तरी वेळ काढून कुरआनचे वाचन करावे, प्रेषितांचे वचने आणि जीवन चरित्र जाणून घ्यावे, निश्चितच आपण ते वाचल्यानंतर स्वत:ला भाग्यवान समजल्याशिवाय राहणार नाहीत, एवढे मात्र नक्की. रमजानबद्दल कुरआनमध्ये अनेक वचने आलेली आहेत. ते उद्या सांगेन इन्शाअल्लाह....💐
-बशीर शेख 'कलमवाला'
0 Comments