जो आपल्या पाल्यांच्या शिक्षणाऐवजी लग्नांवर खर्च करतो तो समाज प्रगती करू शकत नाही - डॉ. अब्दुल खदीर

जो आपल्या पाल्यांच्या शिक्षणाऐवजी लग्नांवर खर्च करतो तो समाज प्रगती करू शकत नाही - डॉ. अब्दुल खदीर




बीड (प्रतिनिधी): येथील शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनींनी नीट मध्ये मिळविलेल्या घवघवीत यशानंतर घेण्यात आलेल्या सत्कार समारंभात आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. अब्दुल खदीर यांनी वरील उद्गार काढले.
बीड शहरातील बार्शी रोडवर असलेल्या हिना पेट्रोल पंपा समोर कर्नाटक राज्याच्या बिदर येथील डॉ. अब्दुल खदीर संचलित शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील पाच विद्यार्थिनींनी यावेळी नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या अनुषंगाने शाहीन इन्स्टिट्यूट कडून हॉटेल गोल्डन चॉईस येथे दिनांक 30 जून 2024 रविवार रोजी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभाकरिता शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक सचिव डॉ. अब्दुल खदीर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. 
या कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे संस्थापक सचिव डॉ. अब्दुल खदीर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, शिक्षण समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे माध्यम आहे. जो समाज आपल्या पाल्यांच्या शिक्षणाऐवजी लग्नांवर खर्च करतो तो समाज प्रगती करू शकत नाही. असे परखड मत मांडले. पुढे म्हटले की, शाहीन इन्स्टिट्यूट मध्ये शिक्षणात कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अकॅडमिक इंटेन्सिव्ह केअर युनिट (एआयसीयु) चालविले जाते. या युनिटमध्ये कमजोर विद्यार्थ्यांवर अतिरिक्त लक्ष देऊन त्यांची शिक्षणात प्रगती करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. आज सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स चे युग आहे. प्रत्येक पालक आपल्या मुला-मुलींना सहजपणे मोबाईल घेऊन देत आहेत. मोबाईल ज्ञान वाढवण्यासाठी आवश्यक असले तरी त्याच्यात अनेक वायफळ गोष्टी सुद्धा आहेत. तेव्हा मोबाईल देताना आपले पाल्य मोबाईल मध्ये असलेल्या वायफळ गोष्टींपासून दूर राहतील यासाठी पालकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. शिक्षणात आणि आयुष्यात विद्यार्थ्यांनी चांगली प्रगती करावी. याकरिता पालकांनी सदैव जागरूक राहणे गरजेचे आहे. कारण आजचा विद्यार्थी उद्याचा जबाबदार नागरिक होणार आहे. आपल्या देशाचा मतदाता होणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच नाही तर त्यासोबत चांगले संस्कार देणे सुद्धा महत्त्वाचे आहे. शिवाय नवीन पिढी घडविणारे शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांनी एक दुसऱ्याच्या प्रगतीला पाहून आनंदित होणे हे सुद्धा एक पुण्य आहे. हे पुण्य कमविण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाने एक दुसर्‍याला सहकार्य करावे. जेणेकरून समाज घडविणाऱ्या शैक्षणिक संस्थांकडून भावी पिढ्या चांगल्या घडविल्या जातील. अलीगढ विद्यापीठातून शिकून निघालेले पुढे चालून जिल्हे, राज्य आणि देश सांभाळणारे व्यक्तिमत्त्व झाले. शाहीन इन्स्टिट्यूट बीड ची शाखा ही फक्त मुलींसाठी चालविली जात आहे. गोरगरीब विद्यार्थिनींना शाहीन मध्ये प्रवेश घेण्यासाठी मस्जिद कमिटी किंवा एनजीओकडून पाठविण्यात आले तर अशा विद्यार्थिनींना फी मध्ये 70 टक्के सूट दिली जाते तर उर्वरित 30 टक्के फी सुद्धा त्या मुलीच्या घरून न घेता मस्जिद कमिटी किंवा एनजीओनी वर्गणी करून शाहीनकडे जमा करावी असे सांगितले जाते तसेच आई-वडिलांना गमावून पोरके झालेल्या विद्यार्थिनींना नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणजेच गैरसरकारी संस्था (एनजीओ) मार्फत आल्यास फी मध्ये 50 ते 70 टक्के सूट देण्यात येते. चांगल्या विद्यार्थिनी घडविण्याकरिता व समाजात सुदृढ व्यक्तिमत्व निर्माण करून देण्याकरिता शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कटिबद्ध आहे. म्हणून विश्वास ठेवून आपल्या मुलींना शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घ्यावा. त्यांच्या शैक्षणिक उन्नती व प्रगती साठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे म्हटले. 
या कार्यक्रमाची सुरुवात आयेशा रेहान या विद्यार्थिनीने क़ुरआन पठण करून केली नंतर हुरूल ऐन मुजीब या विद्यार्थिनीने नात पठण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजी जवेरीया व नमीरा आबेद या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहीन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या बीड जिल्हा शाखेचे प्रमुख प्राचार्य डॉ. पठाण इमरान खान यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन मुज्तबा अहेमद खान, जुनैद सर, असजद सर, डॉ. जुबेर, डॉ. अजित कुमार यादव यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून जमियत उलमा ए हिंदचे जिल्हा अध्यक्ष मौलाना मुफ्ती अब्दुल्ला कुरेशी, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव मुश्ताक अन्सारी, मॅक्सक्युअर हॉस्पिटल चे संचालक डॉ. फिरोज शेख, मिल्लत ग्रुप ऑफ स्कूलचे सचिव उमेर सलीम, मिल्लिया महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मुहम्मद इलयास फाजील, जमाअत ए इस्लामी हिंद चे जिल्हाध्यक्ष सय्यद शफिक हाश्मी, सलाम एज्युकेशन सोसायटीचे सचिव असलम अनवरी, जिल्हा परिषद योजना विभागाचे सहाय्यक योजना अधिकारी खतीब सय्यद मिसबाहुल आबेदीन, दैनिक दिव्य वार्ता व साप्ताहिक कश्मकश वृत्तपत्र समूहाचे संपादक मुहम्मद अबूबकर चाऊस, सर सय्यद स्कूलचे अखिल सर, जमीयत उलमा ए हिंद चे बीड जिल्हा सचिव साबीर मौलाना, पालक आणि विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सय्यद असजद सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments