आज २५ सप्टेंबर "जागतिक फार्मासिस्ट दिवस"
जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणजे काय?
जागतिक फार्मासिस्ट दिवस दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. २००९ पासून हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. हा दिवस इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन (FIP) या संघटनेच्या स्थापनेच्या वर्धापन दिनाचे स्मरण करतो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्टचे महत्त्व अधोरेखित करणे, औषधांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे योगदान पटवून देणे, आरोग्य सुधारण्यासाठी त्यांचा सहभाग दाखविणे आणि रुग्णसेवेतील त्यांच्या भूमिकेची जाणीव करून देणे.
फार्मासिस्ट दिन हा फार्मासिस्टांच्या कठोर परिश्रमांचा सन्मान करणारा दिवस आहे. या दिवशी त्यांच्या संयम, करुणा आणि सेवाभावाचा गौरव केला जातो. रुग्णांच्या काळजीत त्यांची निभावणारी भूमिका ओळखली जाते. डॉक्टरांच्या अक्षरांची कोडी उलगडण्याची कला, रुग्णांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची त्यांची तत्परता आणि अवघड वेळातही हसतमुखाने काम करण्याची त्यांची तयारी यांचे कौतुक केले जाते.
भारतामध्येही फार्मसी व्यवसायाच्या वाढीसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या फार्मासिस्टना एकत्र आणून संवाद, अनुभव आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांची देवाणघेवाण करण्याचे हे एक व्यासपीठ आहे.
दर वर्षा प्रमाणे २०२५ ची थीम – “Think Health, Think Pharmacist”
ही थीम फार्मासिस्ट हे फक्त औषधे देणारे व्यावसायिक नसून आरोग्य व्यवस्थेचे महत्वाचे घटक आहेत, हे अधोरेखित करते. रुग्णसेवा आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यात त्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकते. जागतिक स्तरावर आरोग्य धोरणांमध्ये फार्मासिस्टचा पूर्ण समावेश व्हावा यासाठी ही मोहीम आवाहन करते.
याचा इतिहास सांगायचा म्हणजे २००९ मध्ये FIP (इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन) ने जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्याची परंपरा सुरू केली. या संघटनेचे मुख्यालय नेदरलँड्समध्ये आहे. FIP ही एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे जी फार्मसी, फार्मास्युटिकल शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील १४४ राष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधित्व करते. फार्मसी क्षेत्रात नवकल्पना, शैक्षणिक विकास आणि आरोग्यसेवा गरजा पूर्ण करण्यासाठी जागतिक पातळीवर योगदान देणे हे तिचे ध्येय आहे. २०२० पासून FIP ने जागतिक फार्मसी सप्ताह साजरा करण्यास सुरुवात केली, ज्यात फार्मसी व्यवसायाच्या सर्व पैलूंना अधोरेखित केले जाते. हा दिवस निवडण्यामागे कारण म्हणजे १९१२ साली याच दिवशी FIP ची झालेली स्थापना.
फार्मासिस्टची आरोग्यसेवेत भूमिका
सांगायचे म्हणजे फार्मासिस्ट हे आरोग्य व्यवस्थेतील कणा मानले जातात. त्यांची मुख्य कामगिरी आवश्यक औषधांचा पुरवठा व योग्य वापर सुनिश्चित करणे. रुग्णांना औषधांच्या योग्य वापराबाबत मार्गदर्शन करणे. आरोग्य तपासण्या, जनजागृती मोहिमा आणि सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमात सहभाग घेणे. नवीन औषधांच्या संशोधन आणि विकासात योगदान देणे. प्रतिजैविकांचा जबाबदार वापर प्रोत्साहित करणे. औषधांच्या दुष्परिणामांवर लक्ष ठेवणे व त्याची नोंदणी करणे (फार्माकोव्हिजिलन्स). आणि आरोग्य सुधारण्यासाठी धोरणात्मक बदलांसाठी प्रयत्न करणे.
थोडक्यात फार्मासिस्ट हे फक्त औषधे देणारे नसून रुग्णांचे आरोग्य, सुरक्षितता आणि जीवनमान उंचावणारे खरे आरोग्यसेवक आहेत.
“Think Health, Think Pharmacist” या थीमसह २०२५ चा जागतिक फार्मासिस्ट दिवस आपल्याला फार्मासिस्ट चे आपल्या दैनंदिन जीवनातील अमूल्य योगदान लक्षात आणून देतो.
मी डॉक्टर नाहीये...
पण लोकांची सेवा करणे हा माझा धर्म आहे !!
जसा डॉक्टर औषधांनी जीव वाचवतो,
त्याचप्रमाणे मी माझ्या ज्ञानाने औषधांमध्ये जीव टाकतो!!
डॉक्टरांनी काय लिहिले आहे ते ओळखणारा मी एकमेव आहे,
मी दुसरा तिसरा कोणी नसून एक "फार्मासिस्ट" आहे!!!
-प्रा. सय्यद अब्दुल अजीम अ.
फार्मास्युटिक्स विभाग
शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी
आलमला, ता. औसा, जि. लातूर




0 Comments