*‘रहेमतुल्लील आलमीन’*
*आचरणात आणले तरच यश शक्य*
✍️ *बशीर शेख ’कलमवाला’*
💡 *अल्लाहने मनुष्याची निर्मिती करून त्याला वार्यावर सोडले नसून वेळोवेळी त्याच्या मार्गदर्शनासाठी प्रेषित या सृष्टीवर पाठविले. जवळपास 1 लाख 24 हजार प्रेषित होवून गेले. शेवटचे प्रेषित हजरत मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व सल्लम असून त्यांना अल्लाहने रहेमतुल्लीन आलमीन म्हटले आहे. म्हणजेच समस्त मानवकल्याणासाठी प्रेषित सल्ल. यांचे आचरण ऐहिक आणि पारलौकिक जीवनात यशस्वी होण्याची गुरूकिल्ली आहे.*
अशा प्रदेशात आणि अशा समाजात प्रेषित सल्ल. यांचा जन्म झाला होता जेथे अज्ञानता, अंधश्रद्धा, मानवी मूल्य पायदळी तुडवली जात होती. महिला, मुलींचे तर न विचारलेलेच बरे. नैतिक मुल्यांचा त्यावेळी र्हास झालेला होता. छोट्याशा गोष्टीसाठी कबिले आणि कुटुंबात वर्षोनवर्षे धुसफूस आणि युद्ध होत. अशा मक्का शहरात प्रेषित सल्ल. यांचा जन्म झाला आणि अरबस्तानसह अल्पशा काळात जगभरात आनंदाचा प्रकाश पडला.
*प्रेषित सल्ल. यांनी लहानपणापासूनच आपल्या आचरणाने लोकांची मने जिंकली होती. सभ्य आचरण, भाषा, सन्मान, न्याय, विश्वास, बंधुभाव आणि पराकोटीच्या अतिउच्च नैतिक आचरणाने मक्का शहरात आपला नावलौकिक मिळविला होता. परंतु, जेव्हा त्यांनी एका ईश्वराकडे सर्वांना बोलविण्यास सुरूवात केली तेव्हा त्यांचे जवळचेही प्रारंभी शत्रु झाले. परंतु, कालांतराने त्यांच्या विचारांचा एवढा प्रभाव पडला की एकमेकांचे शत्रू जीवलग मित्र झाले.*
*कुरआनच्या एक-एक आयातींप्रमाणे प्रेषितांनी आपले जीवन जगले. अल्लाहचा उपदेश एका व्यक्तीसाठी, कबिल्यासाठी, प्रांतासाठी, देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगातील शेवटच्या माणसासाठी असल्याचे प्रेषित सल्ल. यांनी सांगितले.*
अल्लाहचा आणि प्रेषित सल्ल. यांचा उपदेश एका छोट्याशा लेखात सांगणे शक्य नाही मात्र जर प्रत्येक व्यक्तीने कुरआन समजून वाचले आणि प्रेषित चरित्र व वचने समजून घेत जीवन जगले तर ऐहिक जीवन आनंदी बनल्याशिवाय राहत नाही.
📒*काय आहेत उपदेश*
*सर्व विश्व एकाच अल्लाहची निर्मिती असून, एकाच आई-वडिलांपासून सर्वांना जन्मास घातले आहे. त्यामुळे जगातील सर्व व्यक्ती आपआपसांत भाऊबंध आहेत. मानवाला ईश्वराने त्याच्या इबादतीसाठी बनविले व समस्त निसर्ग आणि त्यातील सर्व वस्तू ह्या मानवाच्या उपभोगासाठी बनविल्या.*
एकमेकांशी काळा-गोरा, श्रीमंत- गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ असा कोणाशी भेदभाव करू नये. सर्वात श्रेष्ठ तो व्यक्ती असेल जो सर्वाधिक ईशपरायण आणि चारित्र्यसंपन्न असेल. स्त्रीयांना सन्मानाने वागणूक द्या, त्यांच्यावर विनाकारण आळ घेऊन त्यांना त्रास देऊ नका, प्रत्येक स्त्री आणि पुरूषाला शिक्षण घेणे अनिवार्य आहे. मुलींचे चांगले संगोपन करून त्यांना शिक्षण देवून त्यांचा चांगल्या कुटुंबात विवाह करण्याचे प्रेषित सल्ल. यांनी सांगितले.
आदर्श कुटुंबाची जडणघडण कशी असली पाहिजे याचे मार्गदर्शन कुरआनमध्ये आले आहे. प्रेषित सल्ल. यांनी आपल्या आयुष्याच्या 63 वर्षांच्या काळात कुरआन आणि आपल्या वचनातून कयामतपर्यंच्या मानवी समस्यांवर उपाय सांगितले आहेत. ते शासकापासून सामान्यापर्यंत मार्गदर्शक आहेत.
*प्रेषित सल्ल. यांनी सांगितले, सत्य बोलणे तुमच्यावर अनिवार्य आहे कारण सत्य सत्कर्माची वाट दाखवितो आणि सत्कर्म स्वर्गाची वाट दाखवितो. ”
तो व्यक्ती जन्नतमध्ये प्रवेश करू शकणार नाही ज्याचा शेजारी त्याच्या त्रासापासून सुरक्षित नाही.”
” नाते-संबंध तोडणारा स्वर्गात प्रवेश करू शकणार नाही” ”
आई वडिलांशी सद्वर्तन करणे हे कार्य अल्लाहजवळ अति प्रिय कार्यापैकी एक आहे.”
” भुकेने व्याकूळ असलेल्या व्यक्तीला जेवण द्या आणि आजारी व्यक्तीला जावून भेटा आणि संकटात सापडलेल्या व्यक्तींची सुटका करा”
” स्त्रियांच्या बाबतीत अल्लाहचे भय बाळगा कारण तुम्ही त्यांना अल्लाहने दिलेली एक जबाबदारी म्हणून स्वीकारले आहे. आणि अल्लाहच्या वचनाने त्यांना स्वतःसाठी वैध करून घेतले आहे.” ( संदर्भ _ मुस्लिम 2950).
अशी एक ना अनेक वचने जी कयामतपर्यंत माणसाच्या जीवनाशी निगडीत आहेत, त्या सर्वांवर प्रेषितांनी मार्गदर्शन केले आहे.
हे उपदेश जाणून जे स्वतःमध्ये सुधारणा करतील त्यांचे जीवन निश्चित यशस्वी होणे आहे. ते ऐहिकच नव्हे तर पारलौकिक जीवनासाठीही यशस्वीतेची हमी आहे. त्यामुळे समस्त बांधवांना विनंती आहे की, त्यांनी प्रेषित सल्ल. यांच्या वचनांचा हदीस संग्रह आणि कुरआनचे एकदा अवश्य वाचन करावे. कारण प्रेषित मुहम्मद सल्ल. सर्व मानवांसाठी रहेमतुल्लील आलमीन आहेत आणि अल्लाहची रहेमत त्यांच्या या उम्मतवर (समस्त जगवासियांवर) निश्चितच आहे.
*अल्लाहकडे प्रार्थना आहे की मला, तुम्हाला आणि सर्व भारतीय बांधवांना प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या मार्गावर चालण्याची समज आणि सद्बुद्धी देओ.* आमीन....

0 Comments