निळकंठेश्वर कारखान्याकडून जानेवारीत गाळप ऊसाचा पहिला हप्ता २३ कोटी ३५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ४७.७० कोटींचा ऊसबिल जमा

 निळकंठेश्वर कारखान्याकडून जानेवारीत गाळप ऊसाचा पहिला हप्ता २३ कोटी ३५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग 



आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ४७.७० कोटींचा ऊसबिल जमा 





औसा- औसा तालुक्यातील किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना कडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. गळीत हंगाम २०२५–२६ दरम्यान कारखान्याने ऊसबिलाच्या पहिल्या हप्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे.


१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ऊस घालणाऱ्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर प्रति मे. टन २७०० रुपये प्रमाणे एकूण २३ कोटी ३५ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यापूर्वी दि. २२ नोव्हेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत गाळप झालेल्या ऊसासाठीही प्रति टन २७०० रुपयांचा पहिला हप्ता अदा करण्यात आला होता. त्या टप्प्यात सुमारे २४ कोटी ३५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले.यामुळे २२ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत एकूण ४७ कोटी ७० लाख रुपये ऊसबिलाच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याने परिसरातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे, पुढील टप्प्यात त्यांच्या खात्यावरही ऊसबिल जमा करण्यात येणार असल्याची माहिती आ अभिमन्यू पवार यांनी दिली.दरम्यान, अंतिम ऊसदर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांप्रमाणेच स्पर्धात्मक ठेवला जाईल, असे आमदार अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केले आहे.


विशेष म्हणजे, आमदार अभिमन्यू पवार यांच्या अथक प्रयत्नातून बंद अवस्थेत असलेला किल्लारी येथील निळकंठेश्वर सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू झाला असून कारखाना सुरू झाल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा बाजार उपलब्ध झाला असून वाहतूक खर्चात बचत आणि वेळेवर ऊसबिल मिळाल्याने आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होत आहे.एकूणच, निळकंठेश्वर कारखान्याच्या माध्यमातून होत असलेली ही आर्थिक उलाढाल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारी ठरत आहे.

Post a Comment

0 Comments