लातूर शहरातील ऑटो रिक्षांची वाहतूक नियंत्रण शाखेकडून कसून तपासणी* *विना परवाना वाहनचालक, प्रलंबित दंड, युनिफॉर्मचा अभाव, अनधिकृत साऊंड सिस्टिम व रंगीबेरंगी लाईटवर विशेष लक्ष*


*लातूर शहरातील ऑटो रिक्षांची वाहतूक नियंत्रण शाखेकडून कसून तपासणी*


*विना परवाना वाहनचालक, प्रलंबित दंड, युनिफॉर्मचा अभाव, अनधिकृत साऊंड सिस्टिम व रंगीबेरंगी लाईटवर विशेष लक्ष*




लातूर शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऑटो रिक्षांच्या नियमबद्धतेकडे वाहतूक नियंत्रण शाखा, लातूर यांच्याकडून विशेष लक्ष देण्यात येत असून, ऑटो रिक्षांची सध्या कसून तपासणी करण्यात येत आहे.


शहरातील प्रवासी वाहतुकीमध्ये ऑटो रिक्षांचा मोठा सहभाग असून, नागरिकांना सुरक्षित, शिस्तबद्ध व नियमबद्ध सेवा मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रण शाखेकडून ऑटो रिक्षांची कागदपत्रे तसेच वाहन चालविताना करण्यात येणाऱ्या नियमांच्या पालनाची तपासणी केली जात आहे.


तपासणीदरम्यान विना परवाना ऑटो रिक्षा चालविणे, वाहनावर प्रलंबित असलेला दंड न भरता वाहन चालविणे, ऑटो चालकाने निर्धारित युनिफॉर्मचा वापर न करणे आदी बाबी निदर्शनास आल्यास त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.


तसेच काही ऑटो रिक्षांमध्ये मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिमचा वापर करणे, वाहनांना विविध प्रकारच्या अनधिकृत किंवा भडक रंगाच्या लाईट लावून सजविणे आदी बाबीही आढळून येत आहेत. अशा प्रकारांवरही वाहतूक नियंत्रण शाखेचे विशेष लक्ष असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.


*ऑटो चालकांनी काय काळजी घ्यावी?*


लातूर पोलीस विभागाच्या वतीने सर्व ऑटो चालकांना आवाहन करण्यात येते की—


- वाहन चालविताना वैध ड्रायव्हिंग लायसन्स जवळ बाळगावे.


- ऑटो रिक्षाचे वैध परमिट व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत.


- वाहनावर प्रलंबित असलेला दंड असल्यास तो भरून घ्यावा.


- ऑटो चालविताना निर्धारित युनिफॉर्मचा वापर करावा.


- ऑटोमध्ये मोठ्या आवाजाची साऊंड सिस्टिम वापरू नये.


- वाहनाला अनधिकृत किंवा नियमबाह्य रंगीबेरंगी लाईट लावू नयेत.


- वाहतूक नियमांचे पालन करून नागरिकांना शिस्तबद्ध व सुरक्षित प्रवासी सेवा द्यावी.


ऑटो रिक्षा चालकांनी नागरिकांना वाजवी दरात, सुरक्षित आणि शिस्तबद्ध सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे सर्व ऑटो चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन लातूर पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


नियमांचे उल्लंघन करून ऑटो रिक्षा चालविताना आढळून येणाऱ्या चालकांविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे लातूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments