औशात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा!**
**तीन वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूनंतर एमआयएम आक्रमक; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
**औसा :** शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी आक्रमक भूमिका घेत नगर परिषद प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत यापूर्वीही अनेकदा नगर परिषद प्रशासनाला कळविण्यात आले होते. मात्र, वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांना चावा घेण्याच्या घटना घडत असून, पिसाळलेल्या कुत्र्यांचाही धोका वाढल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास एमआयएमच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे त्यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, लातूर, खासदार ओमराजे निंबाळकर आणि औसा पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत.



0 Comments