शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभांच्या शासकीय योजनांचा लाभ द्यावा


 

शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभांच्या शासकीय योजनांचा लाभ द्यावा


                                                           -रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे


*जिल्हयात मनरेगाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी


      लातूर,दि.29(जिमाका) जिल्हयातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक  लाभाच्या शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या सूचना राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री  संदिपान भूमरे यांनी दिल्या.


       येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित मनरेगा आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी  पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) रोजगार हमी, भूकंप पुनवर्सन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार बाबासाहेब पाटील, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शोभा जाधव यांची उपस्थिती होती.


           यावेळी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे बैठकीत म्हणाले की, मनरेगातंर्गतची शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करुन शेतकऱ्यांचे जीनवनमान उंचाविण्यासाठी शासकीय लाभाच्या योजनेचा लाभ द्यावा. प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसेवक, सरपंच, सदस्य यांच्या गटविकास अधिकारी व  तहसीलदार यांनी मनरेगा योजनेची जनजागृती होण्यासाठी कार्यशाळा आयोजित कराव्यात व शासकीय योजनांची माहिती द्यावी अशाही यावेळी स्पष्ट सूचना दिल्या.


     जिल्हयात  मनरेगा अंतर्गतच्या जनावरांच्या गोठयांचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात आहे तरी संबंधीत अधिकाऱ्यांनी जनावरांच्या गोठयांची संख्या तात्काळ वाढवून गावा-गावात मनरेगा अंतर्गत राब‍विण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आराखडा तयार करुन प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचनाही यावेळी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे यांनी दिल्या.


       यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे आयोजित बैठकीत म्हणाले की, जिल्ह्यात 785 ग्रामपंचायतीपैकी 93 ग्रामपंचायतीमध्ये मनरेगा अंतर्गत शून्य टक्के खर्च झाला आहे. त्याची कारणे शोधून ती कामे तात्काळ सुरू करावीत. तसेच जिल्ह्यात 17 टक्के कामे अपूर्ण आहेत तेही पूर्ण करावीत. तसेच जिल्हयात या योजना अंतर्गत जनावरांचे गोठे उभारण्याचे काम अत्यंत कमी प्रमाणात असून जिल्हयात शरद पवार ग्रामसमृध्दी योजना मोठया प्रमाणावर अंमलबजावणी करुन राबविण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. पालकमंत्री पाणंद रस्त्यांचा अखर्चित निधी प्रलंबीत आहे तोही खर्च तात्काळ करावा असे ही त्यांनी स्पष्ट केले.


           या आयोजित बैठकीस जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी, जलसंधारण, फलोत्पादन, रेशीम उद्योग, वनविभागाच्या तसेच आदी विविध संबंधित विभाग प्रमुखांची आढावा बैठकीस उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्तावीक अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी केले तर आभार उपमुख्यकार्यकारी अधिकारी संतोश जोशी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments