बीड नगर परिषदेसह अभियंता, गुत्तेदारही झाले कोडगे! वाहन चालकांसह पादचाऱ्यांचे हाल सुरूच

बीड नगर परिषदेसह अभियंता, गुत्तेदारही झाले कोडगे! 
वाहन चालकांसह पादचाऱ्यांचे हाल सुरूच

बीड (प्रतिनिधी) - शहरातील आसेफ़नगर परिसरात खांदलेल्या नाल्याच्या कामाला गतीही येईना व बीड नगर परिषदेसह अभियंता आणि गुत्तदाराने बॅरिकेट व सूचनाफलक न लावल्याने या रस्त्यावरून ये-जा करणारे दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहन चालकांसह पादचाऱ्यांचे गेल्या आठवडाभरापासून जाम हाल होत आहे. ही बाब मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी बातमीच्या माध्यमातून मांडली होती. याला आता जवळपास आठवडा उलटून गेला आहे. तरीही बीड नगर परिषदेसह संबंधित अभियंता व गुत्तेदाराने नागरिकांचे होत असलेले हाल गांभीर्याने न घेता अजूनही या ठिकाणी येणाऱ्या तिन्ही रस्त्यांवर बॅरिकेट्स व सूचनाफलक आजपर्यंत लावले नाहीत. हे पाहता बीड नगर परिषदेसह या रस्त्याचे व नाल्याचे काम पाहणारे व करणारे अभियंता आणि गुत्तेदार कोडगे झाल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे.
आसेफ़नगरच्या मुख्य रस्त्यासह येथील नाल्याचे काम गेल्या जवळपास दीड वर्षापासून सुरू आहे. अवघ्या काही मीटर अंतराचे असलेले हे काम एवढा मोठा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यातच दिनांक १६ एप्रिल रोजी या रस्त्यावरून वाहणाऱ्या नाल्याची क्रॉसिंग बनविण्याकरिता नाल्यासाठी मोठा खड्डा खांदण्यात आला आहे. त्याला आता पूर्ण एक आठवडा उलटूनही येथील रस्त्याच्या व नाल्याच्या कामाला गती नाही, तसेच या ठिकाणापर्यंत येणाऱ्या तीन रस्त्यांवर पुढे काम सुरू असल्याने रस्ता बंद असल्याचे सूचनाफलक व बॅरिकेट्स अजूनही लावण्यात आलेले नाही. यामुळे १) बार्शी रोड च्या शिवराज पान सेंटर चौकापासून इथपर्यंत, २) मेहेराज मस्जिद चौक पासून इथपर्यंत व ३) बशीरगंज येथून इथपर्यंत येणारे दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहन चालकांसह पादचाऱ्यांचेही मोठे हाल होत आहेत. लांब अंतरावरून इथपर्यंत येऊन त्यांना परत फिरून हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र याचे कुठलेही सोयरसुतक बीड नगर परिषदेसह अभियंता आणि गुत्तेदाराला नाही. आठवडा उलटूनही अजून पर्यंत या ठिकाणी येणाऱ्या तिन्ही रस्त्यांवर बॅरिकेट्स व सूचनाफलक लावण्यात आलेले नाही. येथील काम अत्यंत धीम्या गतीने होत असल्याने नाल्याचे बांधकाम, त्यानंतर पुलाचे व त्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण होण्यास अजून किती महिने लागतील हे सांगता येत नाही. तोपर्यंत बीड नगर परिषदेसह अभियंता आणि गुत्तेदार या रस्त्यावर येणाऱ्या वाहन चालकांचा व पादचाऱ्यांचाही अंत पाहण्यात धन्यता मानणार आहेत का? असा प्रश्न मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून उपस्थित केला आहे.


एस.एम.युसूफ़ (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.

Post a Comment

0 Comments