बीड नगर परिषदेने बॅरिकेट्स, सूचना फलक न लावल्याने वाहन चालक-पादचारी त्रस्तअभियंता,गुत्तेदाराला गांभीर्यच नाही; सौजन्याची ऐशी तैशी!

बीड नगर परिषदेने बॅरिकेट्स, सूचना फलक न लावल्याने वाहन चालक-पादचारी त्रस्त
अभियंता,गुत्तेदाराला गांभीर्यच नाही; सौजन्याची ऐशी तैशी!


बीड (प्रतिनिधी) - शहरातील आसेफ़नगरच्या नाला क्रॉसिंगचे काम मंगळवार दिनांक १६ एप्रिल २०२४ पासून सुरू करण्यात आले आहे. काम सुरू करताना बीड नगर परिषद, अभियंता किंवा गुत्तेदाराने आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट्स व त्यावर सूचनाफलक लावण्याचे सौजन्य न दाखविल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्यांना खोदकाम करण्यात आलेल्या नाल्यापर्यंत येऊन परत फिरावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
आसेफ़नगरचा मुख्य रस्ता व नाल्याचे काँक्रीटीकरण साधारणतः गेल्या दीड वर्षापासून कासवगतीने सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस ठाणे कॉर्नर पासून सुरू झालेले काँक्रिटीकरण गेल्या दीड वर्षात सुद्धा थोरातवाडी कॉर्नर पर्यंत पूर्ण करण्यात आले नाही. आता बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर उर्वरित कामास पुन्हा एकदा सुरुवात झाली असून थोरातवाडी कॉर्नर लगत असलेला आसेफ़नगरच्या हद्दीत येणारा व शहरातील जवळपास चार किलोमीटर लांबून वाहणारा नाला बनविण्याकरिता काँक्रिटीकरण करून काही महिन्यांपूर्वीच बनविलेला रस्ता काल मंगळवार दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी पुन्हा एकदा खांदण्यात आला. नाल्यासाठी आवश्यक असलेले खोदकाम झाले असून आता बांधकामास कधी मुहूर्त लागतो हे माहित नाही परंतु जोपर्यंत नाल्याचे बांधकाम पूर्ण होऊन त्यावर स्लॅब टाकून रस्ता पुर्ववत सुरू होत नाही तोपर्यंत या रस्त्यावरून होणारी वाहतूक इतरत्र वळविण्याकरिता आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट्स व त्यावर सूचनाफलक लावणे अत्यंत आवश्यक असताना बीड नगर परिषदेसह संबंधित अभियंता आणि गुत्तेदाराने याचे सौजन्य काही दाखविले नाही. यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे वाहनचालक व पादचाऱ्यांना नाल्यासाठी खांदण्यात आलेल्या खड्ड्यापर्यंत येऊन परत फिरावे लागत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील रस्ता व नाल्याचे काम संबंधित गुत्तेदार गेल्या दीड वर्षापासून अजूनही पूर्ण करू शकला नाही. यामुळे आता येथील नाला पूर्ण होण्यास किती काळ लागेल हे सांगता येत नाही. म्हणून या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता आवश्यक त्या तीन ठिकाणी बॅरिकेट्स व त्यावर सूचना फलक लावणे अत्यंत आवश्यक आहे.


या तीन ठिकाणी बॅरिकेट्स व सूचनाफलक लावणे आवश्यक

बार्शी रोड वरून आसेफ़नगर च्या मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी शिवराज पान सेंटर चौकात एक, शहिंशहानगर,विद्यानगर पूर्व येथून या रस्त्यावर येणाऱ्यांसाठी मेहराज मस्जिद चौकात आणि बशीरगंज कडून या रस्त्यावर येणाऱ्यांसाठी जुने पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या गेट समोर किमान एक-एक बॅरिकेट्स व त्यावर सूचना फलक लावणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत येथील नाल्याचे व त्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत येथे बॅरिकेट्स असणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांना हेलपाटे मारण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही.


पादचाऱ्यांसाठी खड्ड्यात उतरून जाण्याची व्यवस्था!

आसेफ़नगरच्या या मुख्य रस्त्यावर तीन मार्गाने येणारे वाहन चालक खड्ड्यापर्यंत येऊन परत फिरताहेत मात्र पायी ये-जा करणारे नागरिक खड्ड्यापर्यंत आल्यानंतर लांब वळसा घेऊन परत फिरण्याचे टाळत असल्याने गुत्तेदाराने पादचाऱ्यांसाठी खड्ड्यात थोडेसे दगड व माती टाकून सोय केली आहे. रस्ता सपाटीपासून जवळपास तीन फूट खोल या दगड मातीवर पाय ठेवून आबालवृद्ध, महिला, पुरुष सर्वचजण कसरत करत जोखीम घेत ये-जा करू लागले आहेत. काम पूर्ण होईपर्यंत निदान पादचाऱ्यांसाठी येथून ये-जा करण्याकरिता पर्यायी व्यवस्था करणे सुद्धा आवश्यक आहे.


या तीन गल्लीच्या नागरिकांनाही वाहन चालकांचा होतोय त्रास

जेव्हापासून नाला बनवण्यासाठी या रस्त्यावर खड्डा थांबण्यात आला तेव्हापासून बार्शी रोड वरून खड्ड्यापर्यंत येऊन परत फिरणारे दुचाकी चालक हाजी आसेफ़ गल्ली, क़ूबा मस्जिद गल्ली आणि फाईन टावर गल्ली येथे दुचाक्या घालत असून या तीनही गल्ल्यांचे रस्ते पुढे कुठेच जात नसल्याने गल्लीपूरतेच मर्यादित असल्याने दुचाकी स्वारांसह येथे राहणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

Post a Comment

0 Comments