अल्ताफ शेख यांनी संगीत दिलेल्या लोरी हिंदी चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अल्ताफ शेख यांनी संगीत दिलेल्या लोरी हिंदी चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


बीड (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील छोट्याशा ग्रामीण भागातून पुणे सारख्या मोठ्या शहरात जाऊन चित्रपट दिग्दर्शनाचे बारकावे शिकून दिग्दर्शनासह कथा, पटकथा व गीत लेखन करत चंदेरी दुनियेत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे बीड जिल्ह्याचे जावई अल्ताफ दादासाहेब शेख यांनी लोरी या हिंदी चित्रपटापासून संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पदार्पण केले. त्यांच्या मेहनतीचे येथेही सोने झाले असून त्यांनी प्रथमच संगीत दिलेला लोरी हा हिंदी चित्रपट संपूर्ण देशभरासह बीड शहरातील संतोषीमाता चित्रमंदिर व आशा टॉकीज येथेही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला व याच्या गीत संगीतालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चित्रपट चांगली गर्दी खेचत आहे.
अल्ताफ शेख यांनी पदार्पणातच सुमधूर संगीत दिल्याने अभिनेत्री जागृती जाधव आणि खोपोली महानगरपालिकेचे अधिकारी जाधव यांनी अल्ताफ शेख यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. लोरी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पाच दिवसांत साडेचार कोटींचा गल्ला जमा केला आहे. माऊथ पब्लिसिटीमुळे चित्रपट दुसऱ्या आठवड्यात सिनेमागृहात अजून जास्त गर्दी खेचेल असा अंदाज आहे. चित्रपटातील उर्मिला धनगरी यांनी गायलेल्या हुक्का बड़ा नशीला आणि सुप्रसिद्ध अनुभवी पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी गायिलेले ममता की मुरत ही गाणी प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली आहेत. याच्या संगीत दिग्दर्शनासह गीते ही अल्ताफ शेख यांनीच लिहिली आहेत. चित्रपटाची निर्मिती अविनाश कवठणकर आणि राजू रेवणकर यांनी साईराम अ क्रिएटिव्ह वर्ल्ड या बॅनर खाली केली असून चित्रपटाची कथा, पटकथा, गीत, संगीत आणि कलाकारांनी केलेला उत्तम अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.

Post a Comment

0 Comments