१०० टक्के मतदान करण्याचे तंज़ीम तरक्की उर्दुचे अध्यक्ष हसीन अख्तर यांचे आवाहन
बीड (प्रतिनिधी) - लोकशाहीत मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली, आपण ती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला मिळतात नंतर कोणावर बोटं मोडत न बसता योग्य आणि देशाला पुढे घेऊन जाणारे शासन आणि आपला प्रतिनिधी निवडण्याची ही संधी चुकू न देता सर्व कामे मागे ठेवून एक दिवस देशासाठी देत एकही मत न चुकता शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन तंज़ीम तरक्की उर्दुचे अध्यक्ष सय्यद हसीन अख्तर यांनी केले.
एकवेळ भारतात राजेशाही व नंतर इंग्रजांची हुकूमशाही होती. तेव्हा राजाच्या पोटी राजा हुकूमशहाच्या पोटी हुकुमशहा जन्माला यायचा परंतु आपण लोकशाही स्वीकारली असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने मतदान हा महत्त्वाचा हक्क, अधिकार आपल्याला मिळाला. यामुळे आता मत पेटीतून आपण दिलेल्या मताच्या कौल वरुन लोकप्रतिनिधी निवडून येतो. यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला दिले आहेत. दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजाविलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासन स्थापन होते. येथे चांगली माणसे, चांगली राज्यकर्ते असावेत, असे एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल तर कोणतीही सबब न सांगता अथवा कोणतेही आमिष, प्रलोभन, भीतीला किंवा जाती-पातीच्या मुद्द्याला बळी न पडता प्रत्येकाने मतदान करावे. चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एकेक मत महत्त्वाचे आहे. आपल्या देशाला एकसंघ ठेवून विकसीत मार्गावर घेऊन जाणारे शासन आणि प्रतिनिधी निवडून देण्याची नामी संधी देशाच्या संविधानाने मिळालेली आहे. या संधीचे सोने करत आपल्या शेजारी, संपर्कातील, नातेवाईक, मित्र या सर्वांना मतदानासाठी घेऊन जाऊन आपणही मतदानाचा हक्क बजवावा देशाला विकास, शांती, एकता, बंधुभावाच्या मार्गावर घेऊन जाणारे आपले प्रतिनिधी देशाच्या सार्वभौमत्व सभागृहात पाठवावे असे आवाहन तंज़ीम तरक्की ऊर्दूचे जिल्हाध्यक्ष सय्यद हसीन अख्तर, सचिव डॉ. सिराजखान आरजु , कोषाध्यक्ष डॉ. नासेर बागवान यांनी केले आहे.
0 Comments