वापेगाव (प्रतिनिधी) - ग्रामपंचायतचे सरपंच एकनाथ अगतराव शिंदे यांना नुकताच अमेरिकेचे खगोल शास्त्रज्ञ ठक्कर (ठाणेवाला), खंडू गायकवाड (उपसरपंच), सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अनिकेत केळकर (चित्रपट अभिनेते), अरुणराव शिंदे (ग्रामपंचायत सदस्य वापेगाव), भीमराव करचे (पत्रकार), हनुमंतराव आटपाडकर (महाराज) यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल समस्त वापेगावात त्यांचे अभिनंदन होत असून यापुढेही त्यांच्या हातून अशाच प्रकारे चांगली जनसेवा व्हावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत. यावेळी उपसरपंच खंडू भागवतराव गायकवाड यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार वितरण सोहळा जनादेश टीव्ही न्यूज चैनल कडून आयोजित करण्यात आला होता. सरपंच एकनाथ शिंदे यांना आदर्श सरपंच पुरस्कार देताना त्यांनी ग्रामपंचायत सदस्य पासून ते सरपंच पदापर्यंत केलेल्या विविध लोकोपयोगी, समाजोपयोगी कार्याची दखल घेण्यात आली. शिंदे यांनी आतापर्यंत गरजू गावकऱ्यांना आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळवून दिले. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या होती, ती दूर व्हावी पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा याकरिता पाठपुरावा करून गावात पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू केली. आता गावात नळांना दररोज पाणीपुरवठा करण्यात येतो. याशिवाय पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं म्हणून गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरओ वॉटर फिल्टर ग्रामपंचायत मार्फत चालू करून सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचे कार्य केले. मुख्य रस्त्यापासून गावाला येणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा तयार करून घेतला. यामुळे मुख्य रस्त्यावरून गावाचा आणि दळणवळणाचा प्रश्न सुटला. गावातील गरजूवंत रुग्णांच्या शस्त्रक्रियांसाठी सरकारी योजनेतून शस्त्रक्रिया करून घेतल्या. गावात साजरे होणारे यात्रा व महोत्सव कमी खर्चात पार पाडावे, यासाठी विशेष प्रयत्न केला. सामाजिक सलोखा वृद्धिगंत व्हावा, ग्रामस्थांची भावनिक नाळ तुटू नये, यासाठी जात-पात न मानता सर्व महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथी साजरे करण्यात नेहमी पुढाकार. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसानची भरपाई शासनाकडून लवकर मिळावी म्हणून केवायसी साठी आवश्यक कागदपत्रे व इतर बाबींची पूर्तता वैयक्तिक भेटीगाठी घेऊन केली. डिजिटल साधनांचा वापर करून ग्रामस्थांकडून आलेल्या तक्रार निवारणासाठी मोबाईलवर व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्याचे काम करत आहेत. गावातील शाळा व अंगणवाडी येथे सतत भेट देऊन शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सर्वतोपरी कार्य करत आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावातील विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाऊन महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची वेळ येऊ नये. त्यांना प्राथमिक सारखेच माध्यमिक शिक्षण सुद्धा गावातच मिळावे. याकरिता माध्यमिक विद्यालय गावात स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गावात वीज सातत्याने मिळेल यासाठी सुद्धा 24 तास दक्ष राहून कार्य करत आहेत. सरपंच एकनाथ शिंदे करत असलेले हे सर्व कार्य पाहून जनादेश टीव्ही न्यूज चैनल चे पत्रकार आबासाहेब शिंदे व भीमराव करचे यांनी संपादक मंगेश प्रभुळकर आणि आशु भालेराव यांच्याकडे त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार देण्याचे सुचित केले होते. यानुसार त्यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी दामोदर कृष्णाजी सोमन आणि आरती राठोड, माजी सरपंच दत्तू हेंबाडे, माजी सरपंच अरुण शिंदे, वापेगाव तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, कुंडलिक गायकवाड, सर्जेराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments