नुकताच जगभरात 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे झाडे लावा-झाडे जगवा हा संदेश देण्यात आला. हा संदेश फक्त म्हणून, लिहून किंवा वाचून उपयोग नाही तर प्रत्यक्षात झाडे लावण्याची कृती करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. काल 6 जून रोजी बीडहून औरंगाबादला जावून आज दिनांक 7 जून रोजी परत आलो असता प्रवासात जाता-येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने संपूर्ण सव्वाशे किलोमीटर पर्यंत नजर मारली असता काय दिसले तर रखरख रान आणि रस्त्याच्या दुतर्फा रूक्ष साईड पंखे. हे पाहून मन भूतकाळात गेले. जेव्हा शालेय शिक्षण घेत असताना दिवाळीच्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावर आजोळी दौलताबादला जायचो. तेव्हा काय दिसायचे तर रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी लिंबाची, वडांची, उंबर, बाभूळ, चिंच, आंबे यासारखी मोठ मोठी आणि शुद्ध भारतीय झाडे. रानावनात सुद्धा या झाडांची कमतरता नव्हती. बसच्या खिडकीतून बाहेर पाहिल्यावर पाहतच राहावे असे वाटायचे. अशी हिरवीगार व मोठमोठी झाडे पाहता पाहता मान सुद्धा आकडायची पण मनाला अपरिमित आनंद व्हायचा. मात्र आज जी अवस्था दिसते ती पाहू वाटत नाही. एवढी भीषण अवस्था झाली आहे. गेल्या काही वर्षात आपणच मोठ्या प्रमाणात झाडांच्या कत्तली केल्या. यामुळे आज सगळीकडे कसं रखरख आणि रुक्ष दिसून येतं. झाडे कमी झाल्याने माणसांसह जनावरांना मिळणारी नैसर्गिक सावली नष्ट झाली. शुद्ध ऑक्सिजनची मिळणारी हवा कमी झाली. शिवाय झाडांमुळे पावसाळ्यात पडणारे पाणी जे झाडांद्वारे, झाडांच्या मुळांद्वारे जमिनीत मोठ्या प्रमाणात झिरपत जायचे आज मात्र आवश्यक संख्येत झाडेच राहिली नसल्याने ही क्रिया आता होत नाही. म्हणूनच एकेकाळी जमिनीत विहीर घेताना जिथे 25 ते 30 फूट खांदल्यानंतर पाणी लागायचे, तिथे आता 300 ते 500 फूट खोल बोअर मारावे लागत आहे. यावरून हे लक्षात येते की, आपणच आपल्या हातून आपला विध्वंस करू लागलो आहोत. जेव्हा लोकसंख्या कमी होती, तेव्हा झाडे भरपूर होती. यामुळे जमिनीत पाण्याची साठवण मोठ्या प्रमाणात होत होती. कमी लोकसंख्येमुळे पाण्याचा वापरही कमी होता. आजच्यासारखे ग्लोबल वार्मिंग चे वातावरण नव्हते. म्हणून पाण्याचा वापरही कमी व्हायचा. आज मात्र दिवसेंदिवस रूक्ष व रखरखत्या वातावरणामुळे वाढत जाणारे ऊन आणि त्यामुळे होणारी आपल्या जीवाची लाहीलाही, काही प्रमाणात सुसह्य करण्याकरिता आपण दिवसातून दोन वेळा आंघोळ केली तरी कमी वाटते. दिवसात दोन-तीन वेळा आंघोळ करून आपण आपल्या जीवाची लाहीलाही काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु आंघोळीसाठी लागणाऱ्या पाण्याचं काय? हा विचार कधी आपल्या मनाला शिवत नाही. आज आपण सर्वजण उन्हाळ्यात शरीराला आणि मनाला तृप्त करण्यासाठी दररोज पैसे देऊन पाणी विकत घेतोय. ते थंडगार जार सुद्धा आता दिवसेंदिवस महाग होत चालले आहेत. मात्र या थंडगार पाण्याचे आपल्याला दररोज पैसे मोजावे लागतात. याकडे सुद्धा आपले गांभीर्याने लक्ष जात नाही. लक्षात घ्या आज आपण पिण्यासाठी पैसे देऊन जारचे पाणी विकत घेऊ लागलोय मात्र अशाच प्रकारे सृष्टीबद्दल आपल्या मनात अनास्था राहिली तर ते दिवस दूर नाही जेव्हा आपल्याला आंघोळीलाच काय शौचास जाण्यासाठी सुद्धा विकतचे पाणी घेऊन जावे लागेल. पैसे देऊनही पाणी मिळणार नाही. असे होईल तेव्हा माणूस म्हणून आपण काय करू शकाल? तर काहीच नाही. कारण साप निघून गेल्यावर जसे जमिनीवर दांडकं आपटून उपयोग नसतो किंवा चिमण्या शेतातील कंसाला खाऊन गेल्यावर पश्चाताप करून उपयोग नसतो. तशीच अवस्था तेव्हा माणसासमोर निर्माण होईल. पूर्वी आपल्या देशात राजे-महाराजे सत्ताधीश होते. कमी शिकलेले किंवा काहीच न शिकलेले सुद्धा होते. तरीसुद्धा त्यांनी आजच्यासारख्या शाळा, शिक्षण देणारी मोठमोठी संस्थाने नसताना पर्यावरणाला व प्रकृतीला सांभाळण्याचे बहूमूल्य कार्य केले. प्रत्येक लहान मोठ्या रस्त्यांच्या दुतर्फा चांगली मजबूत भारतीय झाडे लावली, नव्हे ती टिकवली सुद्धा. झाडांची निगा राखली म्हणून शेकडो वर्षांपूर्वी लावलेली झाडे आज सुद्धा कुठे ना कुठे काही प्रमाणात माणसाला सावली, ऑक्सीजन आणि पाणी देत आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलेलो आपण, आपले लोकप्रतिनिधी, सत्ताधारी, विरोधक मुबलक प्रमाणात पैसा असताना, हाताशी सगळ्या यंत्रणा असताना सुद्धा फक्त नवीन रस्ते बनविण्याचे काम करतोय. रस्ते रुंदीकरणाचे काम करतोय परंतु रस्त्यांचे रुंदीकरण करताना जी झाडे तोडली जातात त्याप्रमाणे नवीन झाडे मात्र लावल्या जात नाहीत. यामुळे आज कोणत्याही रस्त्यांवरून जाताना रस्त्याच्या दुतर्फा काय दिसून येते तर रूक्ष झालेली राने-वने, रस्त्याचे दोन्ही कडील साईड पंखे. हीच अवस्था यापुढेही राहिली तर आपला सुजलाम सुफलाम असलेला भारत देश पुढील काही काळात वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या देशात लोकसंख्येच्या मानाने एवढी तेवढी नाही तर चक्क ५०० कोटी झाडे कमी आहेत. आता जून महिन्याचा एक आठवडा उलटून गेला आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळी ही 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आहे. आता 7 जून पासून पावसाळ्याचा हंगाम सुरू होणार आहे. तेव्हा पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचा झाडे लावण्यासाठी उपयोग करून घेता येईल. आपण राहतो तिथेही आणि रस्त्याच्या कडेलाही शक्य होईल तिथे या पावसाळ्याच्या हंगामात झाडे लावण्यास सुरुवात करा. झाडे लावताना हे लक्षात ठेवा की, चांगली मजबूत व भारतीय झाडेच लावा. लावलेली झाडे पावसाळ्याच्या चार महिन्यात तगली तर ती हमखास मोठी होतात आणि त्याचा लाभ माणसांसोबतच पशु-पक्ष्यांनाही होतो. तेव्हा नागरिकांनो, शासन-प्रशासनाकडून आलेले झाडे लावा-झाडे जगवा हे ब्रीद फक्त बोलून, सांगून, ऐकून, वाचून किंवा लिहून उपयोग नाही तर यासाठी झाडे लावण्याची खरी गरज आहे. लावलेली झाडे निगा राखून मोठी करण्यासाठी मेहनत घेणे आवश्यकच नाही तर अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात घ्या.
झाडे जगवणारी वाडा संस्कृती नष्ट
काही काळापूर्वी गरीबातील गरीबाचे घर दगड मातीचे जरी असले तरी एक वेळ त्याच्या घरात खोल्या छोट्या छोट्या असायच्या परंतु अंगण मोठे असायचे आणि त्या अंगणात किमान एक दोन झाडे तरी लावलेली असायची. तीही शुद्ध भारतीय झाडे, परंतु कालौघात आता वाडा संस्कृती मोडीत निघाली, नष्ट झाली आहे. त्याची जागा पक्क्या घरांनी घेतली. यामुळे अंगण विरहित घरांचे बांधकाम होऊ लागले. अंगणच नसल्याने साहजिकच झाडे लावण्याकडे ही कोणाचा कल राहिला नाही. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त खोल्या कशा निर्माण करता येईल याकडे माणसाचा दृष्टिकोन वाढला आहे. वाडे नष्ट झाले, अंगण नष्ट झाले, झाडेही नष्ट झाली आहेत.
चौकट
बिल्डरांना सक्तीची बंधने घालावीत
आजकाल कमी जागेत जास्तीत जास्त बांधकाम व खोल्या कशा काढता येतील, याकडे सर्वसामान्यांसह बिल्डरांचाही कल वाढला आहे. यामुळे दिवसेंदिवस झाडांचा नायनाट होत चालला आहे. ही परिस्थिती अत्यंत विदारक स्थितीत गेली आहे. म्हणून आता शासन-प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज आहे. ज्या-ज्या इमारती बांधून तिथे लोक राहत आहेत अशा इमारतींच्या चारही बाजूने झाडे लावण्याची सक्ती करण्यात यावी. तसेच नवीन इमारतींना परवानगी देण्याअगोदर इमारतीच्या चारही बाजूंनी मजबूत भारतीय झाडे लावण्याची सक्त ताकीद देऊन तसे बंधन घालावे. जो कोणी नवीन इमारतीच्या चारही बाजूने झाडे लावणार नाही, त्याला इमारत बांधकामाची परवानगी देण्यात येऊ नये. जोपर्यंत असे कडक पाऊले उचलली जाणार नाहीत तोपर्यंत झाडे तोडून होत असलेला पृथ्वीचा ऱ्हास थांबणार नाही.
0 Comments