विशेष लेख
मुख्यमंत्री सहायता निधीतून लातूर जिल्ह्यातील
रुग्णांना ४ कोटी ४० लाखांची मदत
राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यात जानेवारी ते जुलै २०२५ या अवघ्या सात महिन्यांत ५४५ रुग्णांना ४ कोटी ४० लाख ७९ हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून अवघ्या तीन महिन्यात १५८ जणांना मदतीचा हात मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून नागरिकांचा विचार करून जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले. त्यातून लाभार्थी नागरिकांची संख्या वाढली. त्यासोबतच आरोग्य शिबिर व रक्तसंकलन आदी उपक्रम प्रभावीपणे राबविणे सहज शक्य होत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यात जानेवारीमध्ये ५८, फेब्रुवारीमध्ये ७१, मार्च ६६, एप्रिलमध्ये ६३, मेमध्ये ७१, जूनमध्ये ९१ आणि जुलैमध्ये ७७ आणि ऑगस्ट महिन्यात १५ तारखेपर्यंत ४८ अशा एकूण ५४५ रुग्णांना सुमारे ४ कोटी ४० लक्ष ७९ हजार रुपये मदत मिळाली आहे.
२० गंभीर आजारांकरिता मिळते मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून २० गंभीर आजारांवरील उपचारासाठी मदत केली जाते. यामध्ये कॉक्लियर इम्प्लांट, हृदयविकार, किडनी, लिव्हर, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, नवजात बालकांचे आजार, मेंदू विकार, डायालिसिस, भाजलेले रुग्ण, विद्युत अपघात आदींचा समावेश आहे.
जिल्हा कक्षाच्या माध्यमातून मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मदत मिळविण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो.
मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (१.६० लाखांपेक्षा कमी), वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असावी, अपघात असल्यास एफआयआर किंवा एमएलसी, अवयव प्रत्यारोपण असल्यास झेडटीसीसी नोंदणी पावती आवश्यक आहेत.

0 Comments