औसा शहरात कचऱ्याचे साम्राज्य; स्वच्छता ठप्प स्वच्छतेचे टेंडर संपल्याने १० ऑगस्टपासून काम बंद; स्वच्छता न झाल्यास ‘टाळे ठोको’ आंदोलनाचा इशारा

औसा शहरात कचऱ्याचे साम्राज्य; स्वच्छता ठप्प

स्वच्छतेचे टेंडर संपल्याने १० ऑगस्टपासून काम बंद; स्वच्छता न झाल्यास ‘टाळे ठोको’ आंदोलनाचा इशारा





औसा प्रतिनिधी

औसा : औसा नगर परिषद अंतर्गत शहरातील स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका संपल्याने १० ऑगस्टपासून शहरातील स्वच्छता व्यवस्था ठप्प झाली आहे. परिणामी शहरातील विविध भागांत कचऱ्याचे ढीग साचले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूसह विविध आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी औसा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, औसा शहरातील स्वच्छतेचे काम ठेकेदार पद्धतीने सुरू होते. मात्र ठेका संपल्यानंतर १० ऑगस्टपासून स्वच्छतेचे काम बंद आहे. मागील काही दिवसांपासून कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनाही काम करण्यास अडथळा आणला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच घंटागाडी व इतर स्वच्छता वाहने बाहेर काढू दिली जात नसल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

शहरातील मुख्य चौकांसह विविध ठिकाणी तसेच दुकानांसमोर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे नागरिक, दुकानदार आणि वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. औसा शहराची लोकसंख्या सुमारे ४० हजार असून, एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नगर परिषद प्रशासनाने तातडीने शहरातील कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबवावी, घंटागाडी व स्वच्छता वाहने सुरू करावीत, तसेच स्वच्छतेच्या कामात अडथळा आणणाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी एमआयएमच्या वतीने करण्यात आली आहे. चर्चा निष्फळ ठरल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शहराची स्वच्छता न केल्यास औसा नगर परिषद कार्यालयावर ‘टाळे ठोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनाची प्रत जिल्हा सहआयुक्त, नगर परिषद प्रशासन लातूर तसेच औसा पोलीस निरीक्षक यांना माहितीस्तव देण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments