रमज़ान : विनम्रता‌ आणि मधूर बोल - बशीर शेख "कलमवाला"

 *रमज़ान : विनम्रता‌ आणि मधूर बोल*




रमज़ानचा पवित्र महिना सुरू होताच वातावरणात एक आध्यात्मिक नूर पसरतो. उपवास (रोजे), नमाज, कुरआनचे पठण आणि दान–सदक़्याची भावना प्रत्येक श्रद्धावंतांच्या हृदयात जागृत होते. पण या इबादतींच्या गर्दीत कुरआनमधील अध्याय सुरह अलबक़राह  (2:263) ही आयत आपल्याला अत्यंत सूक्ष्म पण सखोल मार्गदर्शन करते.

 — *“मधुर शब्द आणि क्षमा त्या दानापेक्षा श्रेष्ठ आहेत, ज्याच्या मागे दुःख आहे.”*


रमज़ानमध्ये आपण मोठ्या उत्साहाने इफ्तारचे आयोजन करतो, गरजूंना मदत करतो; परंतु जर त्या मदतीसोबत टोमणे, उपकाराची जाणीव किंवा अपमान जोडला गेला, तर त्या दानाचा आत्मा नष्ट होतो.


प्रसिद्ध तफसीरकार इब्ने कसीर लिहितात की, “क़ौलुम मआरूफ” म्हणजे गरजवंताला सन्मानाने उत्तर देणे. खरंच जर मदत शक्य नसेल तरीही. “मग़फिरह” म्हणजे त्याच्या कठोर वागण्यावर संयम ठेवून त्याला माफ करणे.


प्रेषित मुहम्मद (सललाहु अलैही व सल्लम) यांनी फरमावले: 

*“जो अल्लाहवर आणि अंतिम दिवसावर ईमान ठेवतो, त्याने चांगले बोलावे किंवा शांत राहावे.” (सहीह बुखारी, मुस्लिम).* 


रमज़ान हा जिभेच्या रोज्याचाही महिना आहे. फक्त भूक-तहान सहन करणे नव्हे, तर शब्दांना शुद्ध करणे हेही त्याचे उद्दिष्ट आहे.


अल्लाह “गनी” (श्रीमंत) आहे—त्याला आपल्या दानाची आवश्यकता नाही; आणि तो “हलीम” आहे—अत्यंत सहनशील. म्हणून रमज़ान आपल्याला शिकवतो की, खरे दान पैशात नाही तर विनम्रतेत आहे; खरे रोजे पोटाचेच नव्हे तर मन आणि जिभेचेही आहेत.


या पवित्र महिन्यात आपण ठरवूया—दान देताना हृदय जिंकू, आणि शब्द बोलताना जखमा नाही तर मलम देऊ.


*कारण कधी कधी एक प्रेमळ वाक्य हे हजार रुपयांच्या सदक़्यापेक्षा अधिक मौल्यवान ठरते.*


- बशीर शेख "कलमवाला"

Post a Comment

0 Comments