औसा शहरातील बंद स्ट्रीट लाईट व स्वच्छतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

 औसा शहरातील बंद स्ट्रीट लाईट व स्वच्छतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी



औसा, प्रतिनिधी :

औसा शहरातील हनुमान मंदिर मुख्य रस्ता ते हाशमी चौक परिसरातील अनेक स्ट्रीट लाईट गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एका खांबावर चार दिवे असूनही ते सर्व बंद असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंधारामुळे अपघात व अन्य गैरप्रकार घडण्याची शक्यता वाढत असल्याने, बंद पडलेले जुने स्ट्रीट लाईट तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. उंच पोलवरील दिव्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली क्रेन उपलब्ध करून कामे लवकर पूर्ण करावीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय, शहरातील अंतर्गत रस्ते व गल्लीबोळातील प्रकाश व्यवस्था आणि स्वच्छता सुधारण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. तसेच, शहरातील वाहतूक व्यवस्था आणि स्थानिक ऑटोचालकांच्या रोजगारावर परिणाम होणार नाही, याचाही विचार प्रशासनाने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

औसा शहर स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषद व संबंधित प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





Post a Comment

0 Comments