चाकूर तालुक्यात शाळेची बस पलटून २२ विद्यार्थी जखमी प्रकरणात बस चालकासह मुख्याध्यापक व संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल.*

 

*चाकूर तालुक्यात शाळेची बस पलटून २२ विद्यार्थी जखमी प्रकरणात बस चालकासह मुख्याध्यापक व संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल.*




फ़ाइल फोटो 👆

  लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पलटी होऊन २२ विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली या प्रकरणात बस चालकाच्या निष्काळजीपणाबरोबरच शालेय बस नियमांचे पालन करण्यात झालेल्या त्रुटींची दखल घेत चाकूर पोलिसांनी बस चालकासह संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


               दि. ०८ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.१४ वाजण्याच्या सुमारास सांडोळ मोड, ता. चाकूर येथे शाळेची बस (क्र. MH-12-PQ-5120) विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना चालकाने वाहन हायगयीने व निष्काळजीपणे चालविल्याने बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी झाली. या अपघातात बसमधील २२ विद्यार्थ्यांना किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.


              या घटनेप्रकरणी फिर्यादी माधव नारायण देशपांडे (रा. सांडोळ, ता. चाकूर) यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), २२३, ३(५) तसेच मोटार वाहन अधिनियम कलम १८४  ३(१)/१८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


                तपासादरम्यान बस चालकाकडे आवश्यक वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. तसेच शालेय बसच्या सुरक्षिततेसंदर्भातील नियमांचे पालन करण्यात झालेल्या गंभीर दुर्लक्षाची नोंद घेऊन बस चालकासोबत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालक यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शेंडगे करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी, चाकूर, पोलीस निरीक्षक भंडे तसेच तपासी अधिकारी यांनी भेट देऊन पंचनामा व आवश्यक कार्यवाही केली.


*लातूर पोलिसांचे शाळा व्यवस्थापन व संस्थाचालकांना आवाहन.*


               शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. त्यामुळे सर्व शाळा, संस्थाचालक, मुख्याध्यापक, वाहन कंत्राटदार व बस चालक यांनी शालेय बससंदर्भातील शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. चालकाकडे वैध परवाना, वाहनाची तांत्रिक तपासणी, आवश्यक सुरक्षा साधने व विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसंदर्भातील सर्व निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, नियमभंग किंवा हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments