डीजे-डॉल्बीच्या कर्कश आवाजाविरोधात किल्लारी पोलिसांची कारवाई.गणेश मंडळाच्या अध्यक्षासह डीजे चालक-मालकाविरुद्ध गुन्हा; वाहनात परवानगीशिवाय फेरबदल केल्याचेही निष्पन्न


*डीजे-डॉल्बीच्या कर्कश आवाजाविरोधात किल्लारी पोलिसांची कारवाई.गणेश मंडळाच्या अध्यक्षासह डीजे चालक-मालकाविरुद्ध गुन्हा; वाहनात परवानगीशिवाय फेरबदल केल्याचेही निष्पन्न*



  किल्लारी 

ध्वनिप्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी लातूर पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमे दरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या आवाहनाला नजुमानता

शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करून विनापरवाना डीजे-डॉल्बी कर्कश व मोठ्या आवाजात वाजविणाऱ्या गणेश मंडळाच्या अध्यक्षासह डीजे वाहन चालक-मालकाविरुद्ध किल्लारी पोलिसांनी गु.र.नं. 308/2026, भा.न्या.सं. कलम 223, 3(5) सह कलम 52/182(अ)(4) मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

                       दि. 23 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.17 वाजण्याच्या सुमारास मौजे रामेगाव, ता. औसा येथील हनुमान मंदिराजवळील चौकात वक्रतुंड गणेश मंडळासमोर सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.


                 आरोपी संदीप बालाजी शेळके, रा. रामेगाव, ता. औसा, हे वक्रतुंड गणेश मंडळाचे अध्यक्ष असून त्यांनी विनापरवाना गणपतीची स्थापना केल्याचे तसेच सिध्देश्वर गोविंद दुधभाते (वय 21 वर्षे), रा. कोतल शिवणी, ता. निलंगा, जि. लातूर, यांनी त्यांच्या ताब्यातील एमएच 04 बीयू 9740 या वाहनावर परवानगीशिवाय फेरबदल करून त्यावर डीजे/डॉल्बीची व्यवस्था करून कर्कश व मोठ्या आवाजात वादन करून धोनी प्रदूषण केले तसेच डीजे-डॉल्बी न वाजविण्याबाबत शासनाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.


                   सदर गुन्हा दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12.11 वाजता दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यादव करीत आहेत.ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली किल्लारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांचे पथकाने केली.


                लातूर पोलिसांकडून गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था तसेच ध्वनिप्रदूषण नियंत्रणास प्राधान्य देण्यात येत असून, शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments