औसा तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा
एमआयएमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत देण्याची मागणी
औसा, दि. २३ सप्टेंबर : औसा तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, कोणतेही निकष न लावता व प्रत्यक्ष पाहणी न करता तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी एमआयएमचे औसा तालुकाप्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यंदा औसा तालुक्यासह मराठवाड्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. पावसाळा संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाअभावी शेतातील पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विहिरी, कूपनलिका तसेच स्थानिक जलसाठे आटत चालल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, जनावरांच्या चारा व पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने उपाययोजना करून शेतकरी आणि ग्रामीण जनतेला दिलासा द्यावा, औसा तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात तातडीने अधिकृत दुष्काळ जाहीर करावा,देवस्थान इनाम जमीन असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदत योजनांमध्ये समाविष्ट करून त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी,बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १ लाख रुपये मदत तातडीने द्यावी, शेतीकर्जाच्या वसुलीस स्थगिती देऊन पीककर्ज माफ करावे, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि जनावरांसाठी चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, रब्बी पेरणीसाठी प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी,विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी पूर्णतः माफ करावी,
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि त्यांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्यासाठी सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी आज औसा तालुक्यातील खरोसा येथील मुख्यमंत्री यांनी नूकसानग्रस्त शेतकरी यांच्या पीक पाणी पाहणीच्या दौ-यासाठी आले असता त्यांना भेटून निवेदन देण्यात आले.


0 Comments