*जमीयत ए अहले हद्दीस यांच्यावतीने आयोजित पयाम ए तालीम कॉन्फरन्स उत्साहात संपन्न*
*पवित्र मक्का येथील मुफ्ती वसीउल्लाह अब्बास यांच्या हस्ते सलफीया कॅम्पस या शैक्षणिक संकुलाची पायाभरणी*
सोलापूर- इस्लाम धर्मात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. पवित्र कुरानची सुरुवात देखील शिक्षणाचे महत्व अधोरेखित करताना झाली आहे. मात्र सध्याच्या काळात मुस्लिम बांधवांमध्ये शिक्षणाचे महत्त्व कमी होताना दिसत आहे. सच्चर कमिटीने जाहीर केलेल्या अहवालामध्ये देखील मुस्लिम धर्मीयांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. हीच गोष्ट लक्षात घेत सोलापूरच्या जमियत ए अहले हदीस यांच्यावतीने एक दिवसीय 'पयाम -ए-तालीम' (शिक्षणाचा संदेश) कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबिया येथील मक्काचे मुफ्ती शेख वसीउल्लाह अब्बास मक्की हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी अरशद मुख्तार मोहम्मदी हाफिजउल्लाह हे होते.
सोलापुरातल्या कुंभारी रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय पयाम ए तालीम उत्साहात पार पडली. या सोहळ्याला हजारो मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावली. देशभरातून आलेल्या इस्लामिक विचारवंतांनी शिक्षणाचे महत्त्व या कॉन्फरन्समध्ये सांगितले. विशेष म्हणजे कुंभारी रोड येथे जमियत ए अहले हदीस यांची चार एकर जमीन आहे. या जमिनीवर भव्य असे शैक्षणिक संकुल उभे करण्यात येणार आहे. इयत्ता पहिली ते दहावी इंग्रजी माध्यमाची शाळा तसेच कला, वाणिज्य तथा विज्ञान या तीनही शाखाचे 11 वी आणि 12 वी कनिष्ठ महाविद्यालय देखील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या शैक्षणिक संकुलाचा पायाभरणी सोहळा देखील पवित्र मक्काचे मुफ्ती शेख शेख वसीउल्लाह अब्बास मक्की यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलताना मुफ्ती शेख शेख वसीउल्लाह अब्बास मक्की असे म्हणाले की, अल्लाह ने कुरानच्या पहिल्या आयतमध्येच शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले आहे. कुरानचा पहिला शब्द वाचण्यास सांगतो. इस्लाममधील अनेक पैगंमबरानी आपलं सर्वस्व अर्पण करून शिक्षण घेतलं. पण सध्याच्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व ओळखले नाही ठिकठिकाणी या पिढीतील लोकांना अपमान सहन करावा लागतोय. सोलापूरच्या जमीयत ए हदीसने शिक्षणाचे महत्त्व ओळखून शैक्षणिक संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. याची पायाभरणी होत असल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे पवित्र मक्काचे मुफ्ती शेख शेख वसीउल्लाह अब्बास मक्की यांनी म्हटलं.
या एक दिवसीय कॉन्फरन्समध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह शेजारील अनेक जिल्ह्यातील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. या कॉन्फरन्समध्ये अरशद मुख्तार मोहम्मदी, अनिस ऊर रहमान आजमी मदनी, अशपाक सलफी मदनी, अब्दुल गफुर जामई, ब्रदर जैद पटेल या इस्लामिक विचारवंतांनी शिक्षणाच्या महत्व अनुषंगाने विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर जमीअत ए अहले हदीसचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मुख्तारअहमद हुमनाबादकर यांच्यासह शहरातील विविध मस्जिदचे उलमा उपस्थित होते. या कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांनी केले.
0 Comments