लिपिकाची नोकरी देतो असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला सापळा लावून पकडले.*
पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे लिपिक पदाच्या तीन जागा रिक्त असून त्या जागेवर नोकरी लावतो म्हणून पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा लावून अलगद उचलले.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की दयानंद गेट जवळ असलेल्या हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत असलेल्या एका 31 वर्षीय विद्यार्थ्याने पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दिली की, पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे लिपिक संवर्गाचे तीन जागा रिक्त असून त्या जागी तुला नोकरी लावतो असे आमिष दाखवून, विश्वास संपादन करून परभणी जिल्ह्यातील एका इसमाने तीन लाख रुपये उकळल्याची तक्रार सदर विद्यार्थ्याकडून दाखल करण्यात आली होती. विशेष म्हणजे फिर्यादी आणि आरोपी हे मूळचे एकाच गावचे रहिवासी आहेत.
त्यावरून दिनांक 01/06/2023 रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 240/2023 कलम 420 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता .
सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सूचना दिल्या.
त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी तपास पथक नेमून फिर्यादीकडे सखोल विचारपूस केली तेव्हा नमूद विद्यार्थ्याकडून नोकरीचे अमिष दाखवून तीन लाख रुपये उकळणारा इसम आजच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूस असलेल्या हॉटेलमध्ये फिर्यादीला भेटण्यासाठी येणार असल्याचे माहिती दिली. त्यावरून लागलीच पोलीस तपास पथकाने हॉटेल बरिस्ता येथे सापळा लावला व थोड्याचवेळात ठरल्याप्रमाणे नमूद व्यक्ती विद्यार्थ्याला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आला तेव्हा विद्यार्थ्याने इशारा करताच सापळ्यातील पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव
1)नवनाथ महादेव सावंत, वय 20 वर्ष, राहणार कोदरी, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी
असे असल्याचे सांगून "मागील 5 महिन्यापासून तो सदर विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून आपली पोलिस अधीक्षक कार्यालयात चांगली ओळख आहे, पोलीस अधीक्षक कार्यालयात लिपिकाच्या तीन जागा रिक्त असून लिपिकाची नोकरी लावतो म्हणून विद्यार्थ्याकडून 3 लाख रुपये उकळल्याचे कबूल केले."
त्यावरून नवनाथ सावंत यास ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक निळकंठे, पोलीस अंमलदार माने हे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, व त्यांच्या पथकातील पोलिस अमलदार राजाभाऊ मस्के, नवनाथ हासबे, तुराब पठाण, जमीर शेख, माधव बिल्लापट्टे, यांनी केली आहे.
सदरच्या अटक आरोपीने नोकरीचे आमिष दाखवून इतरांचीही फसवणूक केल्याची शक्यता असून नवनाथ सावंत यांच्याकडून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावे.




.jpg)

0 Comments