केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्याकडे निवेदनातून मागणी
बीड (प्रतिनिधी) - रेशन दुकान चालविणाऱ्या दुकानदारांना शासनाकडून देण्यात येणारे कमिशन वाढवून देण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन स्वस्त धान्य दुकानदारांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दिले आहे. यावर आठवले यांनी केंद्र शासनाकडे याविषयी पाठपुरावा करू असे आश्वासन निवेदनकर्त्यांना दिले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे रिपाईच्या मेळाव्यात बीड शहरात आले असता अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ, पुणे. संलग्र: ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशन नवी दिल्ली च्या बीड शाखेकडून निरिक्षक सुमित डोंगरे, जिल्हाध्यक्ष परेश मोरे, जिल्हासंघटक रमेशराव गंगाधरे, विशाल इंगोले, वचिष्ठ मसुरे, गणेश भालेराव, मनोज दांगट, परशुराम जाधव, पांडुरंग क्षीरसागर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आज घडीला रेशन दुकानदार हा सरकार व जनतेच्या मधील सर्वात महत्वाचा दुवा आहे. याच दुकानदारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. दुकानदारांना मानधन नाही तसेच कमिशन ही फक्त १५० रूपये क्विंटल प्रमाणे मिळत आहे. यात दुकानदारांना जागा भाडे, मापाडींचे मानधन, लाईट बील, सह ईतर खर्चाचा भार उचलावा लागतो. काही दुकानदारांना ५ ते १० क्विंटल धान्य मिळते. त्यामुळे सर्व खर्च वजा जाता दुकानदारांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले आहे. यामुळे देशाच्या पंतप्रधानांच्या निदर्शनास या सर्व बाबी आणून द्याव्यात. स्वस्त धान्य दुकानदारांना दरमहा मासिक मानधन देण्यात यावे. किंवा कमिशन ३०० रूपये क्विंटल प्रमाणे देण्यात यावे. सध्या दुकानदारांना सरकारच्या वतीने कार्ड धारक यांची ई-केवायसी करण्यासाठी सांगितले आहे. सरकारने दुकानदारांना याचा मोबदला द्यावा नसता कार्ड धारकांकडून प्रती कार्ड १०० रूपये घेण्याची परवानगी द्यावी. सरकारचे धोरण आहे, कोणताही कार्ड धारक धान्यापासून वंचित राहू नये. या दृष्टीने दर महिन्याला ई-पॉस मशिन सर्वर डाऊन असल्याने १० टक्के कार्ड धारकांना धान्य वाटप करणे होत नाही म्हणून त्यांना पुढच्या ही महिन्यात धान्य घेता यावे म्हणून कॅरी ची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. अशा मागण्यांचे निवेदन स्वस्त धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांना दिले आहे.
0 Comments