एचएसआरपी नंबर प्लेट वेळेत बसवा, दंड टाळा !
नंबर प्लेट बसविण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित वाहनांना एचएसआरपी बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेले अधिकृत एचएसआरपी फिटमेंट सेंटरर्स येथे HSRP बसविण्याची कार्यपध्दती व इतर सर्वप्रकारची माहिती विभागाच्या https://www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी लातूर जिल्ह्यातील वाहन वाहनधारकांनी या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने शुल्क भरून 31 डिसेंबर 2025 पूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी, असेही आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांनी केले आहे.

0 Comments