औसा नगरपरिषद-अटीतटीच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णायक विजय.
औसा नगरपरिषद निवडणूक म्हणजे केवळ नगरसेवक निवडीची प्रक्रिया नव्हे,तर ती राजकीय ताकद आजमावणारी, नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी आणि जनतेचा कौल स्पष्ट करणारी अटीतटीची रणभूमी ठरली.या चुरशीच्या लढतीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सत्ता आपल्या हाती घेतली.
निवडणुकीच्या अंतिम निकालानुसार प्रभाग क्रमांक २, ७ व ८ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक १, ३, ४, ५, ६ तसेच ९, १० व ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली.या निकालातून नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून, नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवीन शेख यांची निवड झाली आहे.ही निवडणूक शेवटच्या टप्प्यापर्यंत ताणलेली होती. प्रत्येक प्रभागात प्रचाराच्या फैरी, रणनीतींची आखणी, आरोप-प्रत्यारोप आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेली धडपड यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. सत्तेसाठीचा संघर्ष, नेतृत्वाची प्रतिष्ठा आणि पक्षाची पकड टिकवण्याची धडपड या सर्व घटकांनी ही निवडणूक अधिकच निर्णायक बनवली.
या विजयामागे माजी नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांचे भक्कम नेतृत्व,अनुभव आणि रणनीती निर्णायक ठरली.त्यांच्या सानिध्यात राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक ताकद एकवटत, कार्यकर्त्यांना विश्वासात घेत आणि विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत निवडणूक लढवली. त्यामुळेच या विजयाचे मुख्य शिलेदार म्हणून डॉ.अफसर शेख यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे.त्यांना लाभलेला जनसमर्थन हा त्यांच्या कार्यशैलीवर जनता पुन्हा एकदा विश्वास टाकत असल्याचे स्पष्ट संकेत देतो.
नगराध्यक्षपदावर परवीन शेख यांची निवड ही केवळ पदाची नियुक्ती नसून ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणांवर आणि नेतृत्वावर जनतेने उमटवलेली शिक्कामोर्तब आहे.आता या विजयाचे रूपांतर विकासकामे,पारदर्शक प्रशासन आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या कारभारात करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांवर आहे.अटीतटीच्या या लढतीत मिळालेला विजय हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी केवळ राजकीय यश नसून भविष्यातील वाटचालीसाठी बळ देणारा आणि विरोधकांसाठी स्पष्ट संदेश देणारा निकाल ठरला आहे.
निवडणूक विशेष-ॲड.इकबाल रसूलसाब शेख/औसा.Mo.9545253786




0 Comments