जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६
लातूर जिल्ह्यात १ हजार ७४७ केंद्रांवर शनिवारी मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण
· मतदान पथके रवाना; ८ हजार ४१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश
· जिल्हा परिषदेसाठी २४२, तर पंचायत समित्यांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात
· मतदान यंत्रावर जिल्हा परिषदसाठी पांढऱ्या, पंचायत समितीसाठी गुलाबी मतपत्रिका
लातूर, दि. ०६ : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार
लातूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या १० पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. दरम्यान मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्व मतदान पथके आज संबंधित तालुका स्तरावरून रवाना झाली. तसेच चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने आवश्यक सज्जता केली आहे. जिल्ह्यात एकूण ५९ जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी २४२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून १० पंचायत समित्यांच्या ११८ गणांमध्ये ४१९ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. जिल्ह्यात एकूण १४ लाख ९१ हजार १४९ मतदार असून, यामध्ये ७ लाख ८२ हजार ५१४ पुरुष आणि ७ लाख ८ हजार ६२२ महिला व १३ इतर मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एकूण १ हजार ७४७ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून यासाठी १ हजार ७४७ मतदान पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये एकूण ८ हजार ४१४ अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश राहणार आहे. सर्व केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, शेड आणि स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा राहणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ७४७ बॅलेट युनिट आणि १ हजार ७४७ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदान यंत्रावर जिल्हा परिषद गटाकरिता पांढऱ्या रंगाची तर पंचायत समिती गणाकरिता गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे.
पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पडावी, या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी ८ पोलीस उपाधीक्षक, १८ पोलीस निरीक्षक, १२५ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ९४५ अंमलदार, ३ हजार ८० होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाच्या २ कंपन्या आणि १ प्लॅटून, यासह बाहेर जिल्ह्यातून १ हजार ९४३ होमगार्ड, ५३ अधिकारी, ६३० अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१२ पैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य; मात्र मतदार यादीत नाव आवश्यक
जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव असेल व निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या बारा ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र असेल तर मतदान करता येणार आहे. भारतीय पासपोर्ट, आधार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, केंद्र तथा राज्य शासन किंवा सार्वजनिक उपक्रम यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले फोटोसहित ओळखपत्र, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला फोटोसहित दिव्यांगत्वाचा दाखला, मनरेगा जॉब कार्ड, निवृत्त कर्मचाऱ्याचे अथवा त्यांच्या विधवा तथा अवलंबीत व्यक्ती यांची फोटो असलेली निवृत्तीवेतन विषयक कागदपत्रे, लोकसभा अथवा राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा अथवा विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो असलेले ओळखपत्र, केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहीत कार्ड या बारा ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येईल.
तालुकानिहाय मतदान केंद्र संख्या
लातूर- ३००, औसा-२५०, रेणापूर-१३१, चाकूर-१५१, अहमदपूर-२००, उदगीर-२०४, जळकोट-८४, निलंगा-२६८, शिरूर अनंतपाळ- ७६ आणि देवणी-८३.






0 Comments