लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

 लातूर जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६


मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज






लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १० पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी २०२६ झालेल्या मतदानात लातूर जिल्ह्यातील ९ लाख ५१ हजार २३५ मतदारांनी म्हणजेच ६३.७९ टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी २४२ उमेदवार, तर दहा पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्येक तालुकास्तरावर सकाळी १० पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.



जिल्ह्यात १४२ टेबलवर मतदान यंत्रावरील (ईव्हीएम) मतमोजणीहोणार आहे. लातूर येथे २०, अहमदपूरमध्ये १४, उदगीर येथे १४, निलंगा येथे २०, औसा येथे १८, रेणापूर येथे १६, देवणी येथे १२, शिरूर अनंतपाळ येथे ८, चाकूर येथे १० आणि जळकोट येथे १० टेबलवर ईव्हीएम मतमोजणी होईल. यासोबतच टपाली मतपत्रिका मोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतमोजणीसाठी जिल्ह्यात १ हजार २९१ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


मतमोजणी केंद्रांच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू



लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १० पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी काळात शांतता, निर्भयता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार सर्व मतमोजणी केंद्रांपासून २०० मीटर परिसरात मतमोजणी सुरू झाल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने किंवा तात्पुरत्या रचनांचे उभारणे पूर्णपणे प्रतिबंधित राहील. मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक (लाउडस्पीकर) व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगणे किंवा वापरणे यावर बंदी राहील.



मतमोजणी होणारी ठिकाणे-


१) अहमदपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, नांदेड रोड, अहमदपूर

२) जळकोट : प्रशासकीय इमारत, जळकोट

३) उदगीर : कॅप्‍टन कृष्‍णकांत कुलकर्णी औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, देगलूर रोड, उदगीर

४) देवणी : औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, देवणी 

५) शिरूर अनंतपाळ : तहसील कार्यालय, शिरूर अनंतपाळ

६) चाकूर : तहसील कार्यालय, चाकूर

७) रेणापूर : शासकीय तंत्र प्रशाला, आयटीआय, रेणापूर

८) लातूर : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड, लातूर

९) औसा : प्रशासकीय इमारत, पहिला मजला, ओपन हॉल, तहसील कार्यालय परिसर, औसा 

१०) निलंगा : कार्यशाळा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, बिदर रोड, निलंगा

*****

Post a Comment

0 Comments