*लातूर जिल्ह्यात हेल्मेट सक्तीच्या अनुषंगाने 21 हजार 732 दुचाकीस्वारांवर कायदेशीर कारवाई*
*अपघात व जीवितहानी कमी करण्यासाठी लातूर पोलिसांचा जनजागृतीसोबत कायदेशीर कारवाईवर भर
लातूर जिल्ह्यात वाढत्या अपघातांचे प्रमाण व त्यामध्ये होणारी जीवितहानी कमी करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि. 1 सप्टेंबर 2026 पासून हेल्मेट वापराबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेपूर्वी मार्च महिन्यापासून विविध माध्यमांतून व वेगवेगळ्या स्तरांवर हेल्मेट वापराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. मात्र, हेल्मेट वापरण्याचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याने जनजागृतीसोबत कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवर हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. दि. 1 सप्टेंबर 2026 पासून कालपर्यंत एकूण 21 हजार 732 दुचाकीस्वारांवर हेल्मेट न वापरल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
हेल्मेट वापराबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध स्तरांवर सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगतानाच, हेल्मेट हे केवळ कायदेशीर कारवाईपासून बचाव करण्याचे साधन नसून अपघाताच्या वेळी जीविताचे संरक्षण करणारे सुरक्षा कवच आहे, हा संदेश देण्यात येत आहे.
*गणेश मंडळांचाही हेल्मेट जनजागृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद*
लातूर पोलिसांच्या हेल्मेट जनजागृती अभियानाला गणेश मंडळांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरांसारखे सामाजिक उपक्रम आयोजित करून रक्तदात्यांना हेल्मेटचे वाटप केले. या सामाजिक उपक्रमातून जवळपास 5 हजार नागरिकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
रक्तदानातून जीवनदान आणि हेल्मेटमधून जीविताचे संरक्षण, असा सामाजिक संदेश देत गणेश मंडळांनी हेल्मेट वापराच्या जनजागृतीमध्ये दिलेला सहभाग निश्चितच महत्त्वपूर्ण ठरला आहे.
लातूर जिल्हा पोलीस दलाचा नागरिकांना दंड करणे हा उद्देश नसून, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी टाळणे हा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक दुचाकीस्वाराने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तसेच आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा नियमित वापर करणे आवश्यक आहे.
त्यामुळे लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की, दुचाकीवरून प्रवास करताना स्वतः हेल्मेट वापरा आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक दुचाकीस्वारालाही हेल्मेट वापरण्यास प्रवृत्त करा.
*“हेल्मेट वापरा – स्वतःचा जीव वाचवा, आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करा.”*

0 Comments