औसा : औसा ते खानापूर या रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असतानाच रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाल्याचा आरोप च्या औसा शाखेने केला आहे. याप्रकरणी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून संबंधित कामाची चौकशी करावी तसेच कंत्राटदाराचे बिल अदा करू नये, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.
याबाबत एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, औसा येथील उपअभियंत्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, औसा-खानापूर रस्त्याचे काम करण्यात आले; मात्र बीबीएम, कारपेट आदी कामे पूर्ण झाल्यानंतर अवघ्या चौथ्या दिवशी रस्ता उखडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, मागील सुमारे सहा महिन्यांपासून या मार्गावर गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. पाइपलाइनसाठी रस्ता खोदण्यात आल्याने ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालक, शेतकरी तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत यापूर्वीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी, कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंत्राटदाराचे बिल अदा करू नये, अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी केली आहे.
या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही एमआयएमच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती खासदार, आमदार आणि लातूर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

0 Comments