शिरूर ताजबंदच्या ‘खालाका हॉटेल’मध्ये चहासोबत मिळते आपुलकीची एक घोटभर दुनिया!
काही ठिकाणी आपण चहा प्यायला जातो,पण काही ठिकाणी चहासोबत माणुसकी,आपुलकी,जिव्हाळा आणि मायेची ऊब घेऊन परततो.शिरूर ताजबंद येथील शेख नहन्नूबी यांचा 'खालाका हॉटेल' हे त्यापैकीच एक.बायपास रोडच्या मधून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर,राज्याचे सहकारमंत्री मा.ना.बाबासाहेब पाटील यांच्या घराशेजारी असलेलं हे छोटंसं हॉटेल गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या अस्सल चुलीवरील गावरान चहासाठी आणि त्याहूनही अधिक आपुलकीसाठी प्रसिद्ध आहे.परवा नांदेडहून येताना सहज चहा घेण्यासाठी खालाच्या हॉटेलमध्ये जाणं झालं.चहाचा एक कप घ्यायचा म्हणून थांबलो होतो,पण तिथून निघताना मनात मात्र एक मायेची आठवण घेऊन निघालो.खरं सांगायचं तर त्या चहाची चव फक्त चहाची नव्हती…त्यात चुलीचा धूर होता,गावरानपण होतं आणि खालाच्या मायेची गोडी होती.
खालांचा परिचय करून घेताना सहज विचारलं आणि कळलं की त्यांचं माहेर कटगर गल्ली,औसा येथील नबीसाब शेख खारमुरीवाले यांच्या लेक.'आम्ही औशाचे' एवढं सांगितल्यावर खालांच्या चेहऱ्यावरचा आनंदच बदलला.त्या आणखी जवळ आल्या..जणू काही वर्षांनी माहेरचीच माणसं भेटली आहेत,अशा प्रेमाने बोलू लागल्या.डोक्यावर मायेने हात फिरवला आणि त्या स्पर्शातून जाणवलं की माहेरची माणसं भेटण्याचा आनंद काय असतो,तो अजूनही त्यांच्या मनात तितकाच जिवंत आहे.त्या क्षणी हॉटेलमधील चहापेक्षा त्या मायेचा घोट मनाला जास्त सुखावून गेला.गप्पांच्या ओघात खालांनी आपल्या माहेरच्या आठवणी सांगताना,पै.सालार पटेल साहेब,शमशोद्दीन शेख चाचा,अहेमद शेख चाचा आणि पै.गणी शेख यांची नावं आवर्जून घेतली.हि खूप चांगली माणसं असं शिक्कामोर्तब करून जुन्या आठवणी सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
तदनंतर विषय निघाला तो त्यांच्या लाडक्या चुलीचा.खालांनी चुलीचा स्वभाव सांगताना म्हटलं,'हिला जाळ लावताना गोड बोलून चालत नाही,चालू होत नाही..दोन शिव्या दिल्या की जाळ लागतो!' हे ऐकताच आम्हाला जणू काही त्या चुलीचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिकच पाहायला मिळालं आणि सगळेच जोरजोरात हसू लागलो.ही साधीशी गंमत होती पण त्या क्षणी जाणवलं की माणसाला मोठं करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. साधेपणातही माणुसकी किती सुंदर दिसते.खरंतर खालांची लेकरं आज कमावती आणि सक्षम असतानाही, खाला मात्र स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.कुणावर अवलंबून न राहता आपल्या कष्टाने आणि मेहनतीने त्या आजही हॉटेल चालवतात आणि हाच त्यांचा खरा स्वाभिमान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा पैलू आहे.
आज शिरूर ताजबंदमध्ये खालाका हॉटेल म्हणजे केवळ चहा मिळण्याचं ठिकाण नाही.अनेक वर्षांपासून तिथे येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांना गावरान चहासोबत प्रेमाची दोन शब्दांची सोबत मिळते.राज्याचे सहकारमंत्री मा.ना.बाबासाहेब पाटील हे देखील खालाच्या चहाचे चहाते असल्याचं सांगितलं जातं.त्यांच्याकडे येणारे अनेक कार्यकर्ते शिरूर ताजबंदला आले की खालाच्या हॉटेलमध्ये आवर्जून चहा घेतात.कारण चहा तर अनेक ठिकाणी मिळतो…पण खालाच्या हातचा चहा आणि खालाच्या मनातली माया प्रत्येक ठिकाणी मिळत नाही! खालांचा स्वभावच इतका मायाळू आहे की,समोरची व्यक्ती काही वेळातच आपलीशी होऊन जाते.
शेवटी निघायची वेळ आली.निरोप घेताना खालांनी अगदी काळजीच्या स्वरात सांगितलं-'दमानं जावा,काळजी घ्या!' ही चार शब्दांची वाक्यं कानावर पडली आणि मन खरंच भरून आलं.कारण हा फक्त निरोप नव्हता…तो आईच्या काळजीचा आवाज होता.त्या क्षणी नकळत मला माझ्या अम्मीची आठवण आली.म्हणूनच खालांसोबत एक फोटो काढला.तो फोटो केवळ एक आठवण म्हणून नाही,तर मायेच्या त्या क्षणाचा ठेवा म्हणून कायम मनात राहील.
आजच्या धावपळीच्या जगात माणसं भेटतात,गप्पा होतात,व्यवहार होतात..पण मनापासून आपुलकी देणारी माणसं मात्र दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत.माया, ममता, जिव्हाळा आणि आपुलकी यांची खरी किंमत आपली माणसं भेटली कीच कळते.शिरूर ताजबंदच्या रस्त्यावर असलेलं खालाका हॉटेल कदाचित आकाराने छोटं असेल…पण तिथली चूल मोठी आहे कारण ती चहासोबत माणसं जोडते.तिथला चहा गावरान आहे, पण मन मात्र सोन्यासारखं आहे आणि खाला…त्या फक्त चहा देत नाहीत,त्या प्रत्येकाला काही क्षणांसाठी माहेरच्या मायेची,आईच्या काळजीची आणि आपल्या माणसांच्या जिव्हाळ्याची जाणीव करून देतात.
कदाचित म्हणूनच खालाच्या हॉटेलमधून बाहेर पडताना हातात चहाचा कप नसतो…तर मनात मायेची ऊब असते.खाला,तुमच्या चुलीवरचा चहा पुन्हा पुन्हा प्यावासा वाटतो…पण त्याहून जास्त तुमच्या मायेच्या दोन शब्दांसाठी पुन्हा एकदा शिरूर ताजबंदला यावंसं वाटतं! म्हणून काही भेटी क्षणभराच्या असतात..पण काही माणसं आयुष्यभरासाठी आठवण बनून जातात.
नजरेतील वास्तव-
ॲड.इकबाल रसूलसाब शेख
औसा /मो.9545253786

0 Comments