औसा तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १ लाखांची मदत द्या
MIMकडून मुख्यमंत्री यांना निवेदन; पीककर्ज माफी, चारा-पाण्याची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांची फी माफीचीही मागणी
औसा : यंदा औसा तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने मोठा ताण दिल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर MIMचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी शेतकरी व MIMच्या वतीने मुख्यमंत्री यांना तहसीलदारांमार्फत निवेदन दिले.
निवेदनात, तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. पाणी व चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून जनावरांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन औसा तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात तात्काळ ‘अधिकृत दुष्काळ’ जाहीर करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
देवस्थान इनाम जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेत समाविष्ट करून त्यांच्या खात्यावर मदत जमा करावी.
बाधित शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १ लाख रुपये मदत त्वरित वितरित करावी.
शेतीकर्ज वसुलीस तात्काळ स्थगिती देऊन संपूर्ण पीककर्ज माफ करावे.
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करून जनावरांसाठी चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करावी.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि त्यांना या गंभीर संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

0 Comments