अल्प पावसाने सोयाबीन उद्ध्वस्त! औसा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख, बागायतीसाठी दीड लाखांची मदत द्या; १५ सप्टेंबरला हलगी नाद आंदोलनाचा इशारा

 अल्प पावसाने सोयाबीन उद्ध्वस्त! औसा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा


तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख, बागायतीसाठी दीड लाखांची मदत द्या; १५ सप्टेंबरला हलगी नाद आंदोलनाचा इशारा



औसा तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात यंदा ऐसरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने पिकांचे पंचनामे करून औसा तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या तथा कृषी, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या श्रीमती दिपाली श्याम भोसले यांनी तहसीलदार, औसा यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


पावसाअभावी सोयाबीनचे पीक हातचे गेले असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन युद्धपातळीवर पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये, तर बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाख रुपये तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करून द्यावा, २०२५-२६ मधील खरीप पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


याशिवाय रोहयोअंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे तातडीने सुरू करावीत, पाणीटंचाई लक्षात घेता टँकर अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करावी, तसेच संपूर्ण औसा व लातूर जिल्ह्याला कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


दरम्यान, या मागण्यांवर लवकरात लवकर ठोस कार्यवाही न झाल्यास १५ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, औसा येथे ‘हलगी नाद’ आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही जिल्हा परिषद सदस्या श्रीमती दिपाली श्याम भोसले यांनी निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.यावेळी अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments